गलिच्छ राजकारणाचा कळस : आप सरकारचे मजुमदारांच्या कार्यालयास टाळेनवी दिल्ली: दिल्लीत नायब राज्यपाल नजीब जंग आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यादरम्यान अधिकारक्षेत्रावरून उफाळलेल्या वादाने सोमवारी अत्यंत खालची पातळी गाठली. आप सरकारने हंगामी मुख्य सचिवपदी शकुंतला गामलिन यांच्या नियुक्तीचा आदेश काढणारे ज्येष्ठ सनदी अधिकारी अनिंदो मजुमदार यांच्या कार्यालयाला कुलूप ठोकले. तर सरकारतर्फे मुख्यमंत्र्यांचे सचिव राजेंद्रकुमार यांची सेवा विभागाच्या प्रधान सचिवपदी करण्यात आलेली नियुक्ती नायब राज्यपालांनी सपशेल फेटाळली. दरम्यान मुख्यमंत्री केजरीवाल आज मंगळवारी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना भेटणार आहेत.सेवा विभागाचे प्रधान सचिव असलेले अनिंदो मजुमदार सकाळी त्यांच्या कार्यालयात पोहोचले तेव्हा मुख्यमंत्री कार्यालयाच्या आदेशानुसार त्यांच्या कार्यालयाला कुलूप ठोकण्यात आले होते. जंग यांच्या निर्देशावरून शकुंतला गामलिन यांच्या नियुक्तीचे पत्र जारी करणारे मजुमदार यांना मुख्यमंत्री केजरीवाल यांनी शनिवारीच पदच्युत केले होते. परंतु नायब राज्यपालांनी त्यांच्या बदलीचा आदेश आपली पूर्वपरवानगी घेतली नाही या कारणावरून रद्द केला होता. मजुमदार यांच्या कार्यालयाला कुलूप ठोकल्यानंतर काही तासांनीच आप सरकारने राजेंद्रकुमार यांची सेवा विभागाच्या प्रधान सचिवपदी नियुक्ती केली. परंतु जंग यांनी मुख्यमंत्री केजरीवाल यांना पत्र पाठवून मजुमदारांच्या जागी कुमार यांची नियुक्ती अमान्य करीत याला आपली मंजुरी नव्हती असे स्पष्ट केले. केजरीवाल यांनी रविवारी गामलिन यांच्यावर ११ हजार कोटी रुपयांच्या कर्जप्रकरणी रिलायन्स इन्फ्राची मालकी असलेल्या दोन डिस्कॉम्सची बाजू घेण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप लावला होता. आप सरकार अपयशी करण्याची मोदी सरकारची खेळी असल्याचाही त्यांचा दावा होता. हंगामी मुख्य सचिवपदी गामलिन यांच्या नियुक्तीवरून सत्ताधारी आप आणि नायब राज्यपालांदरम्यान गेल्या आठवड्यात खुले युद्ध छेडले होते. जंग प्रशासनावर ताबा मिळविण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप केजरीवाल यांनी केला होता. (प्रतिनिधी)मुख्यमंत्र्यांच्या तीव्र विरोधानंतरही जंग यांनी शुक्रवारी गामलिन यांची नियुक्ती केली होती. मुख्यमंत्र्यांनी त्यांना पदभार स्वीकारू नका असे स्पष्ट सांगितले होते. परंतु मुख्यमंत्र्यांच्या निर्देशांकडे दुर्लक्ष करून गामलिन यांनी नायब राज्यपालांच्या आदेशाचे पालन केले.गामलिन यांनी घेतली गृहसचिवांची भेट४दिल्लीच्या हंगामी मुख्य सचिव शकुंतला गामलिन यांनी सोमवारी येथे केंद्रीय गृहसचिव एल.सी. गोयल यांची भेट घेतली. अर्धा तास चाललेल्या या बैठकीला पोलीस आयुक्त बी.एस.बस्सी व गृह मंत्रालयातील संयुक्त सचिव (केंद्रशासित प्रदेश) राकेश सिंग हे सुद्धा उपस्थित होते. सामान्य प्रशासकीय मुद्यांवर ही बैठक होती,असे सूत्रांनी सांगितले. ४दिल्लीतील आम आदमी पार्टीच्या सरकारने नायब राज्यपाल नजीब जंग यांना शिंगावर घेण्याचा निर्धार केला आहे. आपण महत्त्वाच्या नोकरशहांच्या नियुक्त्यांबाबत दिलेले आदेश असंवैधनिक असून त्याची अंमलबजावणी करता येणार नाही,असे आप सरकारतर्फे जंग यांना स्पष्ट सांगण्यात आले आहे. उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी सोमवारी सायंकाळी जंग यांना खरमरीत पत्र पाठवून सरकारचा उपरोक्त निर्णय कळविला. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल या संपूर्ण प्रकरणाची माहिती लेखी पत्राद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देणार आहेत, असेही त्यांनी यात स्पष्ट केले.
अधिकारवाद चिघळला
By admin | Published: May 18, 2015 11:50 PM