श्रीनगरः गेल्या काही दिवसांपासून जम्मू-काश्मीरमधल्या राजकीय हालचालींना वेग आला आहे. सध्याची परिस्थिती पाहता पीडीपी, एनसी आणि जम्मू-काश्मीर पीपल्स मूव्हमेंटनं आपत्कालीन बैठक बोलावली आहे. या बैठकीला सर्वच पक्षांनी आपापले प्रतिनिधी पाठवले आहेत. या बैठकीत कोणत्या मुद्द्यावर चर्चा होणार आहे, याचा अद्याप खुलासा करण्यात आलेला नाही. तत्पूर्वी केंद्र सरकारनं सुरक्षेच्या कारणास्तव अमरनाथ यात्रा स्थगित केली आहे. अमरनाथ यात्रेवर दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता गुप्तचर यंत्रणांकडून मिळाल्यानंतर जम्मू-काश्मीर सरकारने यात्रेकरुंना आणि पर्यटकांना सावधानतेचा इशारा देत माघारी परतण्याच्या सूचना दिल्या आहेत.तसेच अमरनाथ यात्रा 4 ऑगस्टपर्यंत स्थगित करण्यात आली आहे. अमरनाथ यात्रेकरू आणि पर्यटकांना काश्मीर घाटीत थांबण्याचा कालावधी कमी करून लवकरात लवकर परतीचा मार्ग स्वीकारण्यास सरकारने सांगितले आहे. जम्मू-काश्मीरचे मुख्य सचिव (गृह) यांच्याकडून जारी करण्यात आलेल्या सिक्युरिटी ऍडव्हायजरीत भाविकांना आणि पर्यटकांना यात्रेचा कालवधी कमी करण्यास आणि लवकरात लवकर परत जाण्यास सांगितले आहे.तर दुसरीकडे जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी काश्मीरमध्ये केंद्र सरकारकडून काही तरी मोठा प्लॅन करण्यात येत असल्याच्या संशय व्यक्त केला आहे. बारामुलामध्ये पत्रकारांशी बोलताना मेहबूबा मुफ्ती म्हणाल्या होत्या , 'जर भाजपाच्या प्रमुख नेत्यांची भाषणे ऐकली आणि खोऱ्यात केंद्रीय सुरक्षा दलाची तैनात पाहिली तर काश्मीरच्या कोणत्याही नागरिकांमध्ये शंका निर्माण होऊ शकते. केंद्रीय सुरक्षा दल हे राज्यातील पोलिसांची डोळेझाक करत आहे. हे सर्व पाहिले तर असे सूचित होते की काही तरी मोठा प्लॅन करण्यात येत आहे.'
जम्मू-काश्मीरमध्ये तणावपूर्ण स्थिती, PDP आणि NCनं बोलावली आपत्कालीन बैठक
By ऑनलाइन लोकमत | Published: August 03, 2019 8:24 AM