श्रीनगर - जम्मू आणि काश्मीरमध्ये पीडीपीने पुन्हा एकदा सत्ता स्थापनेचा दावा केला आहे. त्यामुळे दिल्लीच्या राजकीय वर्तुळात वेगाने घडामोडी घडत आहेत. तर जम्मू आणि काश्मीरमधील भाजप आमदारांची आज तातडीची बैठक बोलाविण्यात आली आहे. तसेच लोकसभेच्या निवडणुकांसोबतच जम्मू आणि काश्मीरमध्ये विधानसभेच्या निवडणुका घेण्यात याव्यात, अशी आमची मागणी असल्याचे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र रैना यांनी म्हटले आहे.
जम्मू आणि काश्मीरमध्ये पीडीपीनं राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा केला आहे. आपल्याकडे नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसचा पाठिंबा असल्याचं पत्र पीडीपीच्या अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती यांनी राज्यपाल सत्यपाल मलिक यांना दिलं. मात्र, पीडीपीचे आमदार इमरान अन्सारीदेखील राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा करणार आहेत. आपल्यासोबत 18 आमदार असल्याचा दावा अन्सारी यांनी केला आहे.
दरम्यान, मेहबूबा मुफ्ती यांनी सत्ता स्थापनेचा दावा करणारं पत्र लिहिल्यावर राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी विधानसभा बरखास्त करण्याचा आदेश दिला आहे. मुफ्ती यांनी नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसच्या मदतीनं सत्ता स्थापनेसाठी प्रयत्न सुरू केले होते. यासाठीचं पत्र राज्यपालांना पाठवत असल्याची माहिती मुफ्ती यांनी ट्विटरवरुन दिली. मात्र, त्यापूर्वीच राज्यपालांनी विधानसभा बरखास्त करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसला धक्का बसला आहे. त्यानंतर, आता लवकरच निवडणूक घेण्याची मागणी जम्मू आणि काश्मीरमधील भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रविंदर रैना यांनी केली आहे.
मार्च 2015 मध्ये भाजपा आणि पीडीपीनं जम्मू-काश्मीरमध्ये सरकार स्थापन केलं होतं. मात्र, यंदाच्या जून महिन्यात भाजपानं सत्तेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. यानंतर जवळपास सहा महिने राज्यात राज्यपाल राजवट लागू आहे. आता माजी मुख्यमंत्री आणि पीडीपीच्या अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती यांनी राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्याकडे सत्ता स्थापनेचा दावा केला आहे. आपल्याकडे नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसचा पाठिंबा असल्याचं त्यांनी राज्यपालांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.
राज्याला देण्यात आलेला विशेष दर्जा टिकवण्यासाठी पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस एकत्र येत असल्याचं मुफ्ती यांनी 'आज तक' या वृत्तवाहिनीला सांगितलं. 'राज्याचा विशेष दर्जा आणि कलम 35 ए याकडे आमचं प्रामुख्यानं लक्ष आहे. हा मुद्दा जानेवारीत उपस्थित झाला होता. तेव्हा मी मुख्यमंत्री होते आणि मी याला विरोध केला होता. काश्मिरी जनतेनं यासाठी प्राणांची आहुती दिली आहे. त्यावेळी अनेक बदलांबद्दल चर्चा सुरू होत्या. मात्र ते बदल जनतेच्या हिताचे नव्हते,' असं मुफ्ती यांनी म्हटलं.