पाटणा, दि. 26 - मुसळधार पावसामुळे बिहारमध्ये भीषण पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी या भागाची हवाई पाहणी केली. यावेळी मुख्यमंत्री नितीश कुमार, उपमुख्यमंत्री सुशील मोदीही त्यांच्यासोबत होते.
हवाई पाहणी केल्यानंतर पूर्णिया जिल्ह्यात वरिष्ठ अधिका-यांसोबत झालेल्या बैठकीत मोदींनी परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी बिहारला तात्काळ 500 कोटी रुपयांची मदत जाहीर केली. बिहारला आवश्यक ते सर्व सहकार्य करु तसेच नुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्रातून पथक पाठवण्याचेही त्यांनी आश्वासन दिले आहे.
बिहारमधल्या या पूरामध्ये आतापर्यंत शेकडो लोकांचे बळी गेले आहेत. मागच्या काही दिवसात आसाम, बिहार, उत्तरप्रदेश आणि पश्चिम बंगालला पूराचा मोठा फटका बसला आहे. आसाममध्ये २१ जिल्ह्यातील २२.५ लाख लोकांना पुराचा फटका बसला यामध्ये 100 पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला आहे.
बिहारमध्ये पाणीच पाणीबिहारमधील महानंदा, कंकई आदी नद्यांना पूर आला असून राज्यात पूरस्थिती आहे. नेपाळ आणि सिमावर्ती भागातील पावसामुळे बिहारमधील नद्यांना पूर आला आहे.
योगी आदित्यनाथ यांनी केली हवाई पाहणीउत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गोण्डा, श्रावस्ती, बलरामपुर बहराइच जिल्ह्यात पूरग्रस्त भागांची हवाई पाहणी केली. पूरग्रस्त भागातील मदत कार्यात हयगय सहन केली जाणार नाही, असे त्यांनी सांगितले. बहराइचमध्ये ऐरिया गावात त्यांनी पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. कर्नलगंजमध्ये पुरात मृत्युमुखी पडलेल्या दोन नागरिकांच्या नातेवाइकांना त्यांनी प्रत्येकी चार लाख रुपये दिले.
उत्तराखंडात ढगफुटी, सहा जणांचा मृत्यूउत्तराखंडात पिथौरागढ जिल्ह्यात धारचूला भागात सोमवारी ढगफुटीच्या वेगवेगळ्या घटनात सहा जणांचा मृत्यू झाला. पहिली घटना धारचूलाच्या नाउघाट भागात घडली. स्थानिक मंगती नदीला पूर आला आणि काही दुकाने व सैन्य शिबिर वाहून गेले. जिल्हाधिकारी आशीष चौहान यांनी सांगितले की, एनडीआरएफच्या तुकडीने घटनास्थळावरुन दोन मृतदेह बाहेर काढले आहेत. तर, सैन्याचा एक जवान बेपत्ता आहे. दुसरी घटना मालपा भागात घडली. येथे स्थानिक नदीला आलेल्या पुरात चार जण वाहून गेले. त्यांचे मृतदेह नंतर सापडले.