देशात आणीबाणी लागू करण्याच्या घटनेला आज ४८ वर्षे पूर्ण झाली आहेत. या निमित्ताने भाजपाने निषेध व्यक्त केला असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या इतिहासात कधीच आणीबाणी विस्मरणात जाणार नाही, अशा शब्दांत आणीबाणीवर टीका केली आहे. याचबरोबर मोदींनी आणीबाणीला विरोध करणाऱ्या नागरिकांना त्यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.
ज्या लोकांनी देशात लोकशाहीची भावना बळकट करण्यासाठी काम करत आणीबाणीला विरोध केला, त्या लोकांना मी श्रद्धांजली वाहतो. आणीबाणी हा आपल्या देशाच्या इतिहासातील एक अविस्मरणीय काळ आहे, जो पूर्णपणे संविधानाच्या मूल्यांच्या विरुद्ध आहे, असे ट्विट मोदी यांनी केले आहे.
दुसरीकडे भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी इंदिरा गांधींचे नाव न घेता गांधी कुटुंबावर टीका करणारे ट्विट केले आहे. 25 जून 1975 रोजी एका कुटुंबाने आपल्या हुकूमशाही वृत्तीमुळे देशातील महान लोकशाहीची हत्या केली आणि आणीबाणीसारखा कलंक लावला. ज्यांच्या निर्दयतेने शेकडो वर्षांच्या परकीय राजवटीलाही मागे टाकले. अशा कठीण काळात अपार यातना सहन करून लोकशाहीच्या स्थापनेसाठी संघर्ष करणाऱ्या सर्व देशभक्तांना मी नमन करतो, असे नड्डा म्हणाले.