मुंबई: एमिरेट्सनं विमानांमधील हिंदू मील बंद करण्याचा निर्णय रद्द केला आहे. प्रवाशांकडून मिळणाऱ्या अभिप्रायांच्या पार्श्वभूमीवर हिंदू मील बंद करण्याचा निर्णय एमिरेट्सनं घेतला होता. तसं प्रसिद्धीपत्रकही कंपनीनं जारी केलं होतं. यावरुन एमिरेट्सला सोशल मीडियावर मोठ्या टीकेचा सामना करावा लागला. यानंतर एमिरेट्सनं यू-टर्न घेत विमानात हिंदू मीलचा पर्याय सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. दुबईच्या एमिरेट्स कंपनीनं विमानातील हिंदू मीलचा पर्याय हटवला होता. मात्र शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाचे पर्याय सुरू ठेवले होते. या निर्णयावरुन कंपनीवर मोठी टीका झाली. सोशल मीडियानं या निर्णयाचा चांगलाच समाचार घेतला. त्यामुळे एमिरेट्सला हिंदू मील बंद करण्याचा निर्णय मागे घ्यावा लागला. परदेशात प्रवास करणारे बहुतांश प्रवासी एमिरेट्सला पसंती देतात. त्या पार्श्वभूमीवर एमिरेट्सनं यू-टर्न घेतल्याचं बोललं जात आहे. 'प्रवाशांच्या प्रतिक्रियांच्या आधारे आम्ही हिंदू मीलचा पर्याय सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे,' असं एमिरेट्सनं बुधवारी संध्याकाळी जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं.प्रवाशांचे अभिप्राय आणि सूचना यांच्या आधारे हिंदू मील बंद करत असल्याचं एमिरेट्सनं मंगळवारी जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं होतं. 'एमिरेट्सनं हिंदू मीलचा पर्याय बंद केला आहे. आम्ही नेहमी विमानात दिल्या जाणाऱ्या सुविधांबद्दल प्रवाशांचे अभिप्राय घेत असतो. याच आधारावर आमच्याकडून सुविधांबद्दलचे निर्णय घेतले जातात,' असं कंपनीनं प्रसिद्धीपत्रकात नमूद केलं होतं. 'हिंदू प्रवासी शाकाहारी आऊटलेट्समधून त्यांचं जेवण बुक करु शकतात. या आऊटलेट्सकडून विमानातदेखील जेवण पुरवलं जातं. यामध्ये हिंदू मील, जैन मील, भारतीय शाकाहारी जेवण, बीफ नसलेलं मांसाहारी जेवण असे विविध पर्याय उपलब्ध असतात,' असंही एमिरेट्सनं प्रसिद्धीपत्रकात म्हटलं होतं.
एमिरेट्सचा यू-टर्न; विमानांमध्ये मिळणार हिंदू मील
By ऑनलाइन लोकमत | Published: July 05, 2018 8:48 AM