तिरुअनंतपुरम - केरळमधील चर्चित जिशा बलात्कार आणि हत्या प्रकरणी सत्र न्यायालयाने आरोपी अमीरुल इस्लामला मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणी अमीरुल इस्लाम हा एकमेव आरोपी असून, न्यायालयाने मंगळवारी त्याला दोषी ठरवलं होतं. गुरुवारी न्यायालयाने त्याला मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली. पेरुमबवूर येथे राहणा-या जिशाची 28 एप्रिल 2016 रोजी हत्या करण्यात आली होती. जिशा कायद्याचं शिक्षण घेत होती. जिशाने बलात्काराला विरोध केल्यानंतर आरोपी अमीरुलने तिची हत्या केल्याचं चार्जशीटमध्ये सांगण्यात आलं आहे.
28 एप्रिल 2016 रोजी जिशाच्या घराजवळच मृतदेह आढळला होता. तिची आई राजेश्वरी यांनी सर्वात आधी मृतदेह पाहिला. विधानसभा निवडणुकीच्या एक महिना आधीच ही घटना घडली होती. ज्यामुळे विरोधकांनी महिला सुरक्षेचा मुद्दा उचलत सरकारवर जोरदार टीका केली होती.
हत्या प्रकरणी अमीरुल हा एकमेव आरोपी आहे. तो आसामचा रहिवासी असून, 10 वर्षांचा असताना घर सोडून गेल्याचा दावा कुटुंबाने केला आहे. जवळपास 85 दिवस या केसची सुनावणी सुरु होती. यावेळी 100 साक्षीदार ज्यामध्ये 15 स्थलांतरित कामगारांचा समावेश आहे, यांना साक्ष देण्यासाठी न्यायालयात हजर करण्यात आलं. त्यांनीही अमीरुल इस्लमाविरोधातील अनेक पुरावे देण्यासाठी मदत केली.
फिर्यादी वकिलांनी 290 पानी पुरावे न्यायालयासमोर सादर केले होते. पाच साक्षीदारांची बचाव पक्षाकडून उलट तपासणीही करण्यात आली. न्यायालयात जे पुरावे सादर करण्यात आले त्यामध्ये फॉरेन्सिक आणि डीएनए चाचणीचा अहवालही जोडण्यात आला होता.
आरोपी अमीरुल इस्लामने आपल्या कबुली जबाबात अन्य एक कामगार अनरुल इस्लाम याने गुन्हा करण्यासाठी उत्तेजित केल्याचा दावा केला होता. पण पोलिसांनी तपास केला असता अनरुल हत्येच्या काही महिन्यांआधीच पेरुमबवूर सोडून गेल्याचं समोर आलं होतं. हत्येचा एकही साक्षीदार पोलिसांच्या हाती नव्हता. मात्र जिशाच्या शेजारी राहणा-या एका महिलेने आरोपीला घरातून बाहेर पडताना पाहिलं होतं. नंतर त्यांनी अमीरुल इस्मालला ओळखलं होतं.
तपासादरम्यान विशेष तपास पथकाने 30 हून अधिक संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं होतं. जवळपास 1500 जणांचा जबाब नोंदवण्यात आला होता. 20 लाख फोन कॉल्स तपासण्यात आले होते, तर पाच हजार जणांचे फिंगरप्रिंट आणि 23 जणांची डीएनए चाचणी करण्यात आली होती.