नवी दिल्ली : सन्मानपूर्वक देण्यात आलेले प्रतिष्ठित पुरस्कार आदराच्या भावनेने जतन केले जावेत. त्यांचे मूल्य राखले जावे, असे ठामपणे सांगत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी भावनेला विवेकापेक्षा वरचढ होऊ देऊ नये, असा सल्ला ‘पुरस्कार वापसी’चे पाऊल उचलणाऱ्या लेखक आणि कलावंतांना दिला आहे. पुरस्कार परत केले जात असल्याबद्दल त्यांनी नाराजीही स्पष्ट केली.समाजातील काही घटनांमुळे संवेदनशील मने व्यथित होतात; मात्र अशा घटनांबद्दल चिंता व्यक्त करताना अभिव्यक्तीचे संतुलन राखले जावे. नाराजीची अभिव्यक्तीही चर्चेतून व्हावी. भावनेच्या भरात वाहात जात विवेकशीलता किंवा तार्किकता नष्ट होऊ नये, असे ते राष्ट्रीय पत्रकारिता दिनानिमित्त प्रेस कौन्सिल आॅफ इंडियाच्या वतीने पत्रकार आणि छायाचित्रकारांना राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करताना म्हणाले. ‘व्यंगचित्र आणि रेखाचित्रांचा अभिव्यक्तीचे माध्यम म्हणून पडणारा प्रभाव’ या विषयावर त्यांनी विचार मांडताना वाढत्या असहिष्णुतेच्या घटनांबद्दल नाराजी व्यक्त करण्यासाठी काही लेखक, इतिहासतज्ज्ञ आणि वैज्ञानिकांसह कलावंतांनी पुरस्कार परत केल्याचा अप्रत्यक्ष संदर्भ दिला. एक गौरवान्वित भारतीय म्हणून आपला घटनादत्त विचार, मूल्य आणि तत्त्वांवर विश्वास असायला हवा. आवश्यकता भासली तेव्हा भारत स्वत:हून चूक दुरुस्त करण्यात सक्षम राहिला आहे, असेही ते ठामपणे म्हणाले. (लोकमत न्यूज नेटवर्क)अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा मूलभूत अधिकारचअभिव्यक्ती स्वातंत्र्य हा देशाच्या राज्य घटनेने बहाल केलेला मूलभूत अधिकार आहे. देशात वृत्तपत्रांचे स्वातंत्र्य हे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा भाग बनले आहे, असे सांगत त्यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांचा उल्लेख केला. खुला विचार आणि खऱ्याखुऱ्या टीकेची प्रशंसा ही आपल्या महान राष्ट्राच्या प्रिय परंपरेपैकी एक आहे. राष्ट्रपतींनी दिवंगत व्यंगचित्रकार आर.के. लक्ष्मण आणि राजेंद्र पुरी यांना आदरांजली अर्पण केली.
भावना विवेकापेक्षा वरचढ नको
By admin | Published: November 17, 2015 3:34 AM