नवी दिल्ली - दिल्लीमहिला आयोगाच्या अध्यक्षा म्हणून कारकीर्द गाजवलेल्या आम आदमी पक्षाच्या नेत्या स्वाती मालीवाल यांना पक्षाकडून मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. आपच्या राज्यसभा उमेदवार म्हणून त्यांचे नामनिर्देशन झाले आहे. त्यामुळे, महिला आयोगाच्या अध्यक्षपदाची खुर्ची त्यांना सोडावी लागली असून आपला पदभार सोडताना त्यांना गहिवरुन आल्याचं पाहायला मिळालं. स्वाती मालीवाल यांनी महिला आयोग कार्यालयातील सहकारी स्टाफची भेट घेतली, यावेळी काहींना अश्रू अनावर झाल्याचं पाहायला मिळालं.
आम आदमी पक्षाकडून राज्यसभेसाठी नामनिर्देश झाल्यानंतर स्वाती मालीवाल यांनी दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यावेळी, पदावरील शेवटच्या क्षण खुर्चीवरुन पायउतार होताना त्या भावूक झाल्या होत्या. स्वाती यांना सुशीलकुमार गुप्ता यांच्याजागी आम आदमी पक्षाकडून राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. सुशील कुमार गुप्ता यांनी हरयाणातील राजकारणात पूर्णपणे सक्रीय होण्याचा निर्णय घेतला आहे. तर, दुसरीकडे संजय सिंह यांना दुसऱ्यांदा राज्यसभा खासदार बनण्याची संधी आम आदमी पक्षाने दिली आहे. संजय सिंह हे तुरुंगातूनच राज्यसभेची निवडणूक लढवणार आहेत.
दरम्यान, १९ जानेवारी रोजी राज्यसभा निवडणूक होत आहे. त्यासाठी संजय सिंह तरुंगातूनच उमेदवारी दाखल करणार आहे. त्यांच्या या उमेदवारीला ईडीने कुठलाही आक्षेप घेतला नाही. तर, स्वाती मालीवाल यांनी आज आपल्या पदाचा राजीनामा दिला. यावेळी, त्यांच्या व त्यांच्या ऑफिस स्टाफच्या डोळ्यातून अश्रू तरळल्याचं पाहायला मिळालं. महिला आयोगाच्या कार्यालयातील महिला सहकाऱ्यांनी त्यांची गळाभेट घेतली, या क्षणी त्याही भावूक झाल्याचं दिसून आलं.