सुरेश भटेवरा,
नवी दिल्ली- दलितांवरील अत्याचाराबाबत संसदेत सारेच पक्ष साहानुभूतीने बोलतात मात्र प्रत्यक्षात हे अत्याचार कसे थांबतील, याविषयी कोणीच काही करीत नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वांना समान हक्क प्रदान करणारी राज्यघटना दिली. काँग्रेस आणि भाजपच्या दीर्घकालिन राजवटीत दलितांवरचे अत्याचार मात्र थांबले नाहीत, असे प्रतिपादन बसप नेत्या मायावतींनी राज्यसभेत केले. अलीकडेच घडलेल्या दलित अत्याचाराच्या दुर्देवी घटनांबाबत अल्पकालिन चर्चेत त्या बोलत होत्या. यावेळी मायावतींखेरीज तमाम पक्षाच्या नेत्यांनी देशभर दलितांवर वाढत चाललेल्या अत्याचाराबाबत चिंता व्यक्त केली. आपल्या मुद्द्याचे विस्ताराने स्पष्टीकरण करीत मायावती पुढे म्हणाल्या, पक्षीय आणि राजकीय मतभेद विसरून देशात दलित व वंचित समाजातले लोक मला देवी मानतात, सन्मानाची वागणूक देतात. त्यांचे श्रध्दास्थान असलेल्या देवीबाबत कोणी अपशब्द वापरणार असेल तर ते कसे सहन करतील? विरोध तर नक्कीच करतील. मी त्यांना कसे थांबवणार? या प्रसंगात देशातले सर्वपक्षीय खासदार माझ्या पाठिशी उभे राहिले, याचे मला समाधान आहे. माझ्याविरुद्ध अपशब्द वापरणाऱ्या दयाशंकरला भाजपने पक्षातून निलंबित करून एक सामान्य उपचार पूर्ण केला आहे. त्यापेक्षा त्याच्या विरोधात पोलिसांकडे तक्रार नोंदवली असती तर अधिक चांगले झाले असते.>दलितविरोधी प्रवृत्तींची आक्रमकता चिंताजनकदलितांना मारहाण करणाऱ्या गोरक्षकांचा तसेच मायावतींच्या विरोधात अपमानजनक शब्दांचा प्रयोग करणाऱ्या दयाशंकर यांचा भाजपच्या विनय सहस्त्रबुध्दे यांनी स्पष्ट शब्दात निषेध केला. राज्यमंत्री रामदास आठवलेंनीही त्यांना दुजोरा देणारे भाषण केले. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे महासचिव सीताराम येचुरी म्हणाले, दलितांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये १९ टक्क्यांनी वाढ झाली आहे. दलितविरोधी प्रवृत्तींची अशी आक्रमकता केवळ भयावह नव्हे तर चिंताजनक आहे.