देशाच्या जडणघडणीत मोलाचा वाटा ठरतो तो औद्योगिक क्रांतीचा. त्यासाठी तंत्रशिक्षणातून होणारी कुशल मनुष्यबळाची निर्मिती महत्त्वाची आणि दिशादर्शक ठरते. आज संचालक, तंत्रशिक्षण संचालनालय यांच्या पुढाकाराने तंत्रशिक्षण संचालनालयाअंतर्गत येणाºया या संस्थांमध्ये तंत्रशिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी अनेक योजना राबविल्या जात आहेत. मात्र, तरीही या क्षेत्राकडे विद्यार्थ्यांनी काही प्रमाणात पाठ फिरविल्यामुळे अनेक जागा रिक्त राहात आहेत. डॉ. अभय वाघ यांनी तंत्रशिक्षण संचालकपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर, महाराष्ट्रातील अभियांत्रिकी पदविका संस्थांमधील पदविका अभ्यासक्रमाच्या जागा रिक्त राहण्याची समस्या सोडविण्यासाठी ते सातत्याने प्रयत्न केले. तंत्रशिक्षणाचा दर्जा उंचाविण्याचा मानस त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला. सीमा महांगडे यांनी त्यांच्याशी साधलेला संवाद.
तंत्रशिक्षण अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांचा कल वाढावा, यासाठी कोणत्या गोष्टींना प्राधान्य देण्यात येत आहे?
भारतीय अर्थव्यवस्था ही कृषी, उद्योग आणि सेवा या क्षेत्रांवर विशेष अवलंबून आहे. यामध्ये सहभागाचा विचार करता, औद्योगिक क्षेत्रातील सहभाग हा तुलनात्मकदृष्ट्या कमी दिसून येतो. याचे कारण तंत्रज्ञानाचा व कुशल मनुष्यबळाचा अभाव. यासाठी तंत्रशिक्षण देणाऱ्या संस्था या सर्वांचा पाया ठरत असतात. मात्र, याआधी कोणत्याही प्रकारची नियमावली नसल्याने जिल्ह्याजिल्ह्यांत वाढणाºया संस्थांमुळे तंत्रशिक्षण अभ्यासक्रमातील रिक्त जागांचा फुगवटा वाढू लागला होता. सर्वात आधी यावर नियंत्रण मिळविणे आवश्यक असल्याने, पुढील काही वर्षांत कोणत्याही अभियांत्रिकी महाविद्यालयांना मान्यता देणार नसल्याचे धोरण राज्याने अवलंबले. क्वालिटी अशुरन्स सेलची स्थापना केली. त्याद्वारे संस्थात्मक दर्जा वाढविण्याचा प्रयत्न केला जाऊ लागला. याचाच परिपाक म्हणून योग्य दिशा आणि व्यवस्थापनाचा अभाव असलेल्या राज्यातील तंत्रशिक्षणाला मागील वर्षापासून दिशा मिळत असून, राज्यात तंत्रशिक्षणाचा केवळ प्रसार होत नसून, विविध संस्थांतून दर्जात्मक तंत्रशिक्षण देण्याचे कार्यही सुरू झाले आहे. यात तंत्रशिक्षण संचालनालयाचा मोलाचा वाटा आहे. उदाहरणादाखल सांगायचे झाल्यास, शैक्षणिक वर्ष २०१९-२० मध्ये पदविका अभ्यासक्रमांचे प्रवेश हे मागील शैक्षणिक वर्षापेक्षा १० टक्क्यांनी वाढले आहेत.
प्रवेश वाढविण्यासाठी कोणत्या गोष्टींवर भर देण्यात आला?
शैक्षणिक वर्ष २०१९-२० मधील पदविका अभ्यासक्रमाचे प्रवेश वाढविण्यासाठी उच्च व तंत्रशिक्षण विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या मार्गदर्शनाखाली तंत्रशिक्षण संचालनालय व महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ यांच्या संयुक्त परिश्रमाने, राज्यातील तंत्रनिकेतनांनी समुपदेशन सभा, जनजागृती मोहीम, जाहिरात असे विविध उपक्रम राबविण्यात आले. त्याचाच परिणाम म्हणून मागील वर्षी प्रवेशात वाढ दिसून आली.
भविष्यातही प्रवेशातील वाढ कायम राखण्यासाठी तंत्रशिक्षण संचालनालयाकडून काय प्रयत्न सुरू आहेत?
शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मधील पदविका प्रवेशाची वाढ कायम राखण्यासाठी स्कूल कनेक्ट उपक्रमांतून अभ्यासक्रमांची माहिती तळागाळांतील शाळांतील शेवटच्या विद्यार्थ्यापर्यंत पोहोचविण्याची प्रक्रिया सुरू आहे. यंदा दहावीची परीक्षा देणाºया विद्यार्थ्यांमध्ये परीक्षांपूर्वीच पदविका अभ्यासक्रमांच्या प्रवेशाबाबत जागृती करणे आवश्यक आहे. यासाठी शासकीय तंत्रनिकेतनांच्या प्राचार्यांना त्यांच्या जवळपासच्या परिसरातील शाळांमध्ये तंत्रनिकेतनातील अधिकाऱ्यांच्या प्रबोधन भेटी आयोजित करून, इयत्ता दहावीच्या वर्गात शिकत असलेल्या विद्यार्थी व त्यांच्या पालकांकरिता समुपदेशन सभा, जनजागृती मोहीम, जाहिराती इ. प्रकारे जनजागृती करण्याबाबत निर्देश दिले आहेत.
पदविका अभ्यासक्रमामधील प्रवेशात वाढ होण्याच्या दृष्टीने काही पावले उचलली आहेत का?
पदविका अभ्यासक्रमामधील प्रवेशात वाढ होण्याच्या दृष्टीने पत्रके, बातमीपत्रे, शाळांमध्ये पत्रकांचे वितरण, प्रत्येक शाळेत पोस्टर्स, एमएससीआयटी केंद्र, कोचिंग क्लासेस, ग्रामपंचायत, झेरॉक्स सेंटर्स, जिल्ह्याच्या प्रत्येक शाळा, तसेच जागोजागी बॅनरद्वारे जागृती केली जात आहे. सोबतच स्थानिक वर्तमानपत्रांत व स्थानिक केबल नेटवर्कवर काही दिवसांसाठी जाहिराती द्याव्यात, समुपदेशन कामात माजी विद्यार्थ्यांचा समावेश करून घ्यावा, जागरूकता वाढवावी, याबाबतचे निर्देशही देण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांना पदविका प्रवेशासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे, प्रवेश सुविधा केंद्रांबाबत माहिती व तंत्रशिक्षणासंबंधी नोकरी, व्यवसायाच्या संधी याबाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे. याचप्रमाणे, अभियांत्रिकीच्या पदवी अभ्यासक्रमांकरिताही ‘कॉलेज कनेक्ट’ ही संकल्पना राबविण्यात येणार आहे. या संकल्पनेतून अकरावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना अभियांत्रिकीच्या विविध शाखा आणि अभ्यासक्रमाबद्दल माहिती दिली जाईल.
प्रवेशानंतर विद्यार्थी अभ्याससक्षम / कुशल बनविण्यासाठी संचालनालयाकडून काही विशेष प्रयत्न होतात का?
तंत्रशिक्षणाचा दर्जा उंचाविण्याचा आमचा मानस आहे. त्या दृष्टीने आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करीत आहोत. विद्यार्थी तंत्रशिक्षण अभ्यासक्रमामध्ये प्रवेशित झाल्यानंतर, त्याला कुशल मनुष्यबळामध्ये परिवर्तित करण्याआधी तो त्यासाठी सक्षम होणे आवश्यक आहे. यासाठी संचालनालय काही विशेष उपक्रम राबवित आहे. सुरुवातीच्या आठवडे- दोन आठवड्यांमध्ये इंडक्शन प्रोग्रामच्या साहाय्याने त्याची तेथील अभ्यासक्रमाशी, वातावरणाशी ओळख करून त्याचा आत्मविश्वास वाढविण्याचा प्रयत्न केला जातो. त्यानंतर, बेसलाइन टेस्टद्वारे विद्यार्थ्यांची बलस्थाने व कमजोर क्षेत्रे ओळखून, त्यांना त्यानुसार त्यांच्या शैक्षणिक वाटचालीमध्ये रेमेडीअल कोचिंगद्वारे मदत केली जाते. विद्यार्थी प्रवेश वाढविण्यासाठीचे एक महत्त्वाचे पाऊल म्हणजे विद्यार्थ्यांना पदविका पूर्ण झाल्यानंतर नोकरीची संधी उपलब्ध करून देणे. ज्या तंत्रनिकेतनांची ओळख रोजगारांची खात्री करून देणारी संस्था अशी होईल, अशा संस्थांमध्ये निश्चितच विद्यार्थी प्रवेश संख्येत वाढ होईल. पदविका, पदवी व पदव्युत्तर पदवीमध्ये प्रवेशित विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविणे, त्यांच्यासाठी जास्तीत जास्त नोकरीच्या संधी उपलब्ध करून देणे, यासाठी शासन व तंत्रशिक्षण संचालनालय प्रयत्नशील आहे. यासाठी उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय यांचे सहकार्य तसेच नव्याने पदभार स्वीकारलेले उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांचेही उत्तम मार्गदर्शन लाभत आहे.
विद्यार्थी प्लेसमेंट्स आणि प्राचार्य प्रशिक्षण यासाठी काही योजना आहेत का?
उद्योगांच्या गरजांनुसार अभ्यासक्रमात सुधारणा करण्यात आली आहे. पहिल्या वर्षापासून अंतिम वर्षाच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी मायक्रो-प्रकल्प अनिवार्य केले आहेत. अभ्यासक्रमात सुधारणा करताना उद्योगांची माहिती घेण्यात आली आहे. चौथ्या सत्रानंतर सर्व विद्यार्थ्यांसाठी सहा आठवड्यांचे औद्योगिक प्रशिक्षण अनिवार्य करण्यात आले आहे. पदविका शिक्षणासाठी बृहत-आराखडा तयार केला आहे. दर्जेदार तांत्रिक शिक्षण सुनिश्चित करण्यासाठी प्राध्यापकांना वेळोवेळी मोठ्या प्रमाणावर प्रशिक्षण दिले पाहिजे. यशदा पुणे आणि एन.आय.टी.टी.टी.आर. भोपाळ व पुणे येथील विस्तार केंद्र येथे प्राध्यापक प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात येतात. प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांना उद्योगाबाबत प्रशिक्षण घेण्यास प्रोत्साहित केले जाते आणि त्यानुसार अदानी, थर्मल पॉवर स्टेशन, एल अँड टी, सिमन्स इंडिया लिमिटेड, मर्सिडीज बेन्ज, यामाहा, महिंद्रा यांसारख्या उद्योगांचे प्रशिक्षण कार्यक्रम प्राध्यापक वर्ग व विद्यार्थ्यांसाठी आयोजित केले जातात. मात्र, यासोबतच विद्यार्थ्यांनीही सकारात्मक प्रतिसाद देणे गरजेचे आहे. कारण इतर क्षेत्रांप्रमाणेच तंत्रशिक्षण पदविका अभ्यासक्रमातही उज्ज्वल भविष्य आणि रोजगाराच्या उत्तम संधी उपलब्ध असून, विद्यार्थी-पालकांनी त्यांचा फायदा घेऊन भवितव्य घडविणे, ही काळाची गरज आहे.