नवी दिल्ली: वॉलमार्टनं फ्लिपकार्ट कंपनी खरेदी करत भारतीय ई-कॉमर्स क्षेत्रात पाऊल टाकलंय. वॉलमार्ट आणि फ्लिपकार्टमधील या व्यवहारामुळे फ्लिपकार्टचे कर्मचारी मालामाल झालेत. वॉलमार्टनं 22 अब्ज डॉलर मोजून फ्लिपकार्ट कंपनी खरेदी केली. यामुळे फ्लिपकार्टच्या कर्मचाऱ्यांच्या संपत्तीत मोठी वाढ होणाराय. भारतीय कंपन्यांच्या इतिहासातील ही सर्वात मोठी वाढ ठरलीय. दोन कंपन्यांमध्ये झालेल्या व्यवहारामुळे एम्प्लॉयी स्टॉक ओनरशिप प्लानमधील (ईसॉप्स) संपत्तीचं मूल्य 13 हजार 455 कोटी म्हणजेच 2 अब्ज डॉलरवर जाऊन पोहोचलंय. फ्लिपकार्टच्या आजी-माजी 100 कर्मचाऱ्यांकडे ईसॉप्स आहेत. वॉलमार्टनं फ्लिपकार्ट खरेदी केल्यामुळे ईसॉप्सच्या किमतीत मोठी वाढ झालीय. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वॉलमार्ट ईसॉप्ससाठी 100 टक्के बायबॅक ऑफर आणणार आहे. त्यामुळे कंपनीचे समभाग असलेल्या कर्मचाऱ्याला एका समभागामागे 150 डॉलर म्हणजेच 10 हजार रुपये मिळतील. मात्र समभाग विकायचे की नाहीत, याचा निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य कर्मचाऱ्याचा असेल. यामुळे कंपनीचे अनेक आजी-माजी कर्मचारी कोट्यधीश होतील. यामध्ये फोनपे सीईओ आणि संस्थापक समीर निगम, फ्लिपकार्टच्या तंत्रज्ञान विभागाचे माजी प्रमुख अधिकारी आमोद मालवीय, वेबफॉर्म उडानच्या ऑपरेशन्स विभागाचे माजी अध्यक्ष सुजीत कुमार यांचा समावेश आहे. फ्लिपकार्टकडून चार वर्षांपासून कर्मचाऱ्यांना कंपनीचे समभाग दिले जात होते. कर्मचारी दर महिन्याला हे समभाग कंपनीला विकू शकत होता. फ्लिपकार्टसोबतच ऍक्सिस बँक, विप्रो, एचसीएल टेक या कंपन्यादेखील कर्मचाऱ्यांना समभाग देतात. यामुळे कर्मचाऱ्यांच्या संपत्तीत मोठी वाढ होते. कर्मचाऱ्यांच्या संपत्तीत वाढ करण्यात इन्फोसिस देशातील पहिल्या क्रमांकाची कंपनी आहे.
फ्लिपकार्टचे कर्मचारी झाले मालामाल; वॉलमार्टच्या खरेदीमुळे लागली लॉटरी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2018 11:43 AM