ऑनलाइन लोकमत
रायपूर, दि. २३ - मुलींनी रात्री बाहेर फिरणं (नाईट आऊट) हे आपल्या संस्कृतीत बसत नाही, या भाजपा मंत्र्याच्या विधानामुळे वाद निर्माण झालेला असतानाच आता भाजपाचीच सत्ता असलेल्या छत्तीसगडमधील शाळेत ' नोकरदार करणा-या महिलाच बेरोजगारीसाठी कारणीभूत' असल्याचे शिकवले जात आहेत. छत्तीसगड बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशनतर्फे (सीजीबीएसई) छापल्या जाणा-या १० व्या इयत्तेच्या पुस्तकातील धड्यात हे कारण नमूद करण्यात आले आहे. राज्यातील जशपूर जिल्ह्यातील एका शिक्षिकेने राज्य सरकारच्या या मुद्याचा विरोध करत हे धडे म्हणजे पक्षपातीपणा असल्याचे सांगत विद्यार्थ्यांना असे धडे का शिकवले जात आहेत, असा सवाल विचारला आहे.
सीजीबीएसईतर्फे छापल्या जाणा-या १० वीच्या सोशल सायन्सच्या पुस्तकात 'आर्थिक समस्या व आव्हाने' असा धडा असून ' सर्व क्षेत्रात महिलांनी काम करण्यास सुरूवात केल्यामुळे स्वातंत्र्यानंतर बेरोजगारांचा टक्का वाढला आहे' असे त्यात नमूद करण्यात आले आहे. मात्र धड्यातील या वाक्यावर शिक्षिका सौम्या गर्ग यांनी आक्षेप नोंदवत याविरोधात राज्य महिला आयोगात याचिका दाखल केली आहे. महिलांनाही रोजगार मिळवण्याचा समान हक्क असल्याचे त्यांनी आपल्या याचिकेत म्हटले आहे.