हैदराबाद, दि. 16 - मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्या वृंदा करात यांनी कामावर जाणा-या महिलांना मासिक पाळीदरम्यान सुट्टी मिळावी या मागणीला पाठिंबा दिला आहे. मासिक पाळीदरम्यान महिलांना सुट्टी मिळावी यासाठी कायदेशीर तरतूद केली गेली पाहिजे असं मत वृंदा करात यांनी व्यक्त केलं आहे. 'महिलांना मासिक पाळीदरम्यान सुट्टी घेण्याची सुविधा देण्यात आली पाहिजे. सुट्टी हवी आहे की नाही यासाठीही तिच्याकडे पर्याय उपलब्ध असला पाहिजे. यासाठी कायद्यात तरतूद करायला काही हरकत नाही', असं वृंदा करात बोलल्या आहेत.
आणखी वाचाचर्चा मासिक पाळीच्या सुट्टीचीया देशात मासिक पाळी आली की महिलेला काढतात घराबाहेरवृंदा करात यांनी या विषयावर पुढे बोलताना सांगितलं आहे की, 'मासिक पाळीमध्ये वेगवेगळे प्रकार असतात. अशा परिस्थितीत सुट्टीची गरज आहे की नाही हा पर्याय महिलांकडे असला पाहिजे'. कामासाठी घराबाहेर पडणा-या महिलांना मासिक पाळीदरम्यान सुट्टी दिली पाहिजे अशी मागणी गेल्या काही दिवसांसून होत आहे. मुंबईतील "कल्चर मशिन" नावाच्या एका खासगी कंपनीने मासिक पाळीच्या पहिल्या दिवशी महिलांना सुट्टी जाहीर केल्यानंतर हा मुद्दा चर्चेत आला होता.
केरळ सरकारनेही गेल्याच आठवड्यात महिलांना मासिक पाळीदरम्यान सुट्टी मिळावी यासाठी नियम आखत असल्याचं सांगितलं होतं. वेगवेगळ्या मुद्द्यांवर चर्चा केल्यानंतरच नियम आणला जाईल असंही राज्य सरकारने सांगितलं होतं.
मासिक पाळीबद्दल थोडक्यात माहिती - मुलगी वयात आल्यावर योनीमार्गातून दर महिन्यास जो रक्तस्राव होतो, त्यालाच मासिक पाळी असे म्हणतात. मुलगी साधारणपणे १२-१३ वर्षांची झाली की, मासिक पाळी सुरु होते. कधी कधी थोडी अगोदरही सुरु होऊ शकते. मासिक पाळी ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. ज्यामुळे महिलेला आई बनता येते. पण हेच चक्र बिघडले तर? पाळी मागे-पुढे झाली तर अनेकांना काळजी वाटते. पाळी उशिरा येण्यामागेही काही महत्वाची कारणे असतात. यामध्ये लठ्ठपणा, तणाव, वजन कमी होणे, प्रजनन नियंत्रण, थायरॉईड, गर्भधारणा या कारणांमुळे पाळी उशिरा येऊ शकते हे लक्षात घेतलं पाहिजे. "कल्चर मशिन" नावाच्या कंपनीने केली सुट्टी जाहीरमुंबईतील "कल्चर मशिन" नावाच्या एका खासगी कंपनीने मासिक पाळीच्या पहिल्या दिवशी महिलांना सुट्टी जाहीर केली आहे. डिजिटल कंपनी असणा-या "कल्चर मशिन"मध्ये एकूण 75 महिला काम करतात. आपल्या महिला कर्मचा-यांसाठी कंपनीने हा निर्णय घेत पहिल्या दिवसाची सुट्टी जाहीर केली आहे. ही सुट्टी भरपगारी असणार आहे, त्यामुळे सुट्टी घेतल्यामुळे एक दिवसाचा पगार जाण्याची भीती नसणार आहे. आपल्या हा निर्णय जाहीर करण्याआधी कंपनीने महिला कर्मचा-यांना मासिक पाळीसंबंधी त्यांची मतं विचारली. सोबतच पहिल्या दिवशी सुट्टी किती गरजेची असते यासंबंधी प्रश्न विचारले. यासंबंधी व्हिडीओही शूट करण्यात आला. याचवेळी कंपनीने महिलांना आपण हा निर्णय लागू केल्याची माहिती दिली. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या महिला कर्मचा-यांनी सर्व कंपन्यांनी हा निर्णय घ्यावा असं आवाहनही केलं होतं.