अयोध्या - प्रभू श्रीरामाची नगरी असलेल्या अयोध्येत येत्या २२ जानेवारीला राम मंदिरातील प्राण प्रतिष्ठा सोहळा पार पडणार आहे. राम मंदिर हे देशभरातील तसेच जगभरातील पर्यटकांचे आकर्षणाचे केंद्र बनले आहे. राम मंदिराच्या उद्घाटनानंतर लाखो पर्यटक दररोज अयोध्येत येण्याची शक्यता आहे. त्याच वेळी, २०३० पर्यंत दररोज पर्यटकांची संख्या ३ लाखांपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे. यामुळे हॉटेल उद्योगासाठी मोठ्या संधींची दारे खुली होत आहेत.
अयोध्येबद्दल पंचतारांकित ते छोट्या हॉटेल्सपर्यंत तयारी सुरू झाली आहे. अयोध्येतील प्रचंड बाजारपेठ पाहून ताज, मॅरियट, सरोवर हॉटेल्स अँड रिसॉर्ट्स, जेएलएल ग्रुप, रॅडिसन यासारखे मोठे हॉटेल ब्रँड अयोध्येत आपली हॉटेल्स बांधत आहेत. यासोबतच अयोध्येत छोटी हॉटेल्सही सुरू होत आहेत. शेकडो नवीन हॉटेल्स सुरू झाल्यामुळे अध्याध्येतील तसेच आसपासच्या तरुणांना हॉटेल मॅनेजर, फूड अँड बेव्हरेज मॅनेजर, रूम डिव्हिजन मॅनेजर, किचन मॅनेजर, हाऊसकीपिंग मॅनेजर, एक्झिक्युटिव्ह शेफ, सेल्स अँड मार्केटिंग मॅनेजर, फ्रंट ऑफिस मॅनेजर, अशा नोकरीची संधी निर्माण होणार आहे. इन्व्हेंटरी मॅनेजर, हॉटेल रिसेप्शनिस्ट, बुकिंग एजंट, आयटी मॅनेजर, गार्ड इत्यादी प्रोफाइलमध्ये भरपूर नोकऱ्या उपलब्ध असतील.
हॉटेल उद्योगातील तज्ज्ञांचं म्हणणे आहे की, श्री राम मंदिराच्या स्थापनेमुळे अयोध्या धार्मिक आणि सांस्कृतिक राजधानी बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. प्रभू रामाला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर मिळालेली ख्याती लक्षात घेता येत्या काही दिवसांत मोठ्या संख्येने पर्यटक येण्याची शक्यता आहे. हॉस्पिटॅलिटी क्षेत्रासाठी ही एक संजीवनी मानली जात आहे. गेल्या काही वर्षांत सोशल मीडियावर अयोध्या शोधणाऱ्यांची संख्या सुमारे एक हजार टक्क्यांनी वाढली आहे. हे आकडे हॉटेल आणि इतर संबंधित क्षेत्रांसाठी आशा वाढवतात. पुढील काही वर्षांत अयोध्या दररोज येणाऱ्या भक्तांच्या बाबतीत पहिल्या क्रमांकावर असेल. सध्या देशातील सर्वात श्रीमंत मंदिरांपैकी तिरुपती बालाजी या बाबतीत पहिल्या क्रमांकावर आहे. तेथे दररोज ५० हजार भक्त येतात. कोणत्याही विशेष प्रसंगी किंवा सुट्टीच्या दिवशी ही संख्या एक लाखाच्या जवळपास पोहोचते असं या उद्योगाशी संबंधित लोक सांगतात.
योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री झाल्यानंतर अयोध्येच्या विकासावर त्यांनी वैयक्तिक विशेष लक्ष केंद्रित केल्यामुळे आणि दीपोत्सवासारख्या कार्यक्रमांद्वारे देशाचे आणि जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. येथे येणाऱ्या पर्यटकाची संख्या सातत्याने वाढली आहे. पर्यटन विभागाच्या आकडेवारीनुसार, २०१७ पर्यंत दरवर्षी साधारणपणे दोन लाख पर्यटकांनी अयोध्येला भेट दिली. आता त्यांची संख्या दोन कोटी झाली आहे. पुढील काही वर्षे हॉटेल उद्योगात दरवर्षी २०००० ते २५००० लोकांना रोजगार मिळेल, असा अंदाज आहे. उत्तर प्रदेश सरकारच्या पर्यटन विभागाचे प्रधान सचिव मुकेश मेश्राम यांच्या मते, २०३० पर्यंत दररोज सुमारे तीन लाख भक्त अयोध्येत येतील. प्राण प्रतिष्ठा सोहळ्यानंतर काही आठवडे ही संख्या तीन ते सहा, सात लाखांच्या दरम्यान राहू शकते. ज्यांना राहायचे आहे त्यांना त्यांच्या बजेटनुसार, अयोध्येत हॉटेल्स, मोटेल, रेस्टॉरंट्स आणि वाहतूक सुविधांची आवश्यकता असेल.