श्रीनगर: जम्मू-काश्मीरमधील बडगाम सेक्टर येथे भारतीय सुरक्षा दलाला मोठं यश मिळालं आहे. सुरक्षा दलाच्या गोळीबारात चार दहशतवादांचा खात्मा झाला असून अजूनही शोध मोहीम सुरूच आहे. गुरूवारी सकाळपासून सुरक्षा दल आणि गावात लपून बसलेल्या दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू होती. दरम्यान, या वर्षी भारतीय सुरक्षा दलांनी सुमारे २०० दहशतवाद्यांना कंठस्नान घातल्याचे सांगण्यात येतं आहे.
गावामध्ये काही दहशवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षारक्षकांना मिळाली होती. सुरक्षारक्षक तेथे पोहचल्यावर दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. सुरक्षारक्षकांनी या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर देत गोळीबार केला. दरम्यान, दहशतवादी व सुरक्षारक्षकांमध्ये चकमक सुरू असल्याचं समजतं आहे. दरम्यान, बडगाम सेक्टरमध्ये मोबाइल इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.
दरम्यान, याच महिन्यात २१ नोव्हेंबर रोजी उत्तर काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यातील गुज्जर पट्टी भागाततील जंगलात लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली होती. यामध्ये निमलष्करी दलाच्या एका जवानाला वीरमरण आलं होतं.