श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु झाली आहे. जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये दोन ठिकाणी चकमक सुरु आहे. तर अवंतीपोरामधील शरशाली भागात सुरक्षा दलाच्या जवानांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केल्याचे समजते.
मिळालेल्या माहितीनुसार, पहिल्यांदा रात्री उशिरा अंवतीपोरामधील शरशाली खिरयु भागात सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. त्यानंतर पुलवामा जिल्ह्यातील शार पम्पोर भागात चकमक सुरु झाली. एएनआयच्या माहितीनुसार, सुरक्षा दलाच्या जवानांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. तर, या ठिकाणी आणखी दोन ते तीन दहशतवादी लपल्याची माहिती सुरक्षा दलाच्या जवानांना मिळाली आहे.
जम्मू-काश्मीर पोलिसांच्या माहितीनुसार, अंवतीपोरा भागात हिज्बुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेचा कमांडर रियाज नायकू आणि त्याच्या साथीदाराला सुरक्षा दलाच्या जवानांनी घेरले आहे. तसेच, दक्षिण काश्मीरमधील काही भागातील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. घटनास्थळी सुरक्षा दलाची अतिरिक्त टीम दाखल झाली आहे. या परिसराला जवानांनी घेरले आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून दहशतवाद्यांनी कुरापती सुरु केल्या आहेत. भारतीय सुरक्षा जवानांकडून त्यांना चोख प्रत्युत्तर दिले जात आहे.