श्रीनगर - दक्षिण काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात मंगळवारी (10 एप्रिल) रात्रीपासून भारतीय लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. कुलगाम परिसरात एका घरामध्ये लपलेल्या दोन दहशतवाद्यांना जवानांनी घेराव घातला असून आतादेखील चकमक सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. या चकमकीच्या पार्श्वभूमीवर दक्षिण काश्मीर परिसरात इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय रायफल्सला मंगळवारी रात्री कुलगाममधील वनपोह परिसरात 2-3 दहशतवादी असल्याची माहिती मिळाली. यानंतर जम्मू-काश्मीर पोलिसांची विशेष तुकडी आणि सीआरपीएफच्या सैनिकांनी परिसरामध्ये शोधमोहीम सुरू केली. शोधमोहीमेदरम्यान दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार केला, यास जवानांनीही चोख प्रत्युत्तर दिले. दरम्यान, सुरक्षेच्या कारणास्तव परिसरातील इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात आली आहे.
11 दहशतवाद्यांचा खात्मा
काही दिवसांपूर्वी, जम्मू-काश्मीरमधल्या अनंतनाग आणि शोपियनमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या गोळीबारात 11 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता. तर एका दहशतवाद्याला जिवंत पकडण्यात आले होते. जिवंत पकडण्यात आलेल्या दहशतवादी हिजबुल मुजाहिद्दीन संघटनेशी संबंधित असल्याची माहिती समोर आली होती.