जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. यादरम्यान 5 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाला मोठे यश मिळाले आहे. कुपवाडामधील एलओसीच्या जुमागुंडा भागात ही चकमक सुरू आहे. दरम्यान, मिळालेल्या खास माहितीच्या आधारे सुरक्षा दलांनी येथे सर्च ऑपरेशन सुरू केले, त्यानंतर चकमक सुरू झाली.
मिळालेल्या माहितीनुसार, जम्मू-काश्मीर पोलीस आणि लष्कराने संयुक्त कारवाईदरम्यान 5 दहशतवाद्यांचा खात्मा केला. सर्च ऑपरेशनदरम्यान दहशतवाद्यांनी सुरक्षा दलाला जवळ येताना पाहिल्यानंतर त्यांनी गोळीबार सुरू केला. यानंतर सुरक्षा दलांनीही प्रत्युत्तर दिले आणि चकमक सुरू झाली. या कारवाईत ठार झालेले पाच दहशतवादी पाकिस्तानचे असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच, या भागात आणखी दहशतवादी लपल्याची माहिती समोर येत आहे. त्यांच्या शोध घेण्यासाठी सर्च ऑपरेशन राबविण्यात येत आहे.
दरम्यान, दहशतवादी अलमास सध्या पाकिस्तानात लपून बसला आहे. तेथून तो आपल्या नेटवर्कद्वारे काश्मीरमध्ये अल्पसंख्याकांच्या टार्गेट किलिंगचा कट रचत असल्याचे समोर आले आहे. पोलिस प्रवक्त्याने सांगितले की, कुपवाडा स्थित पोलिसांच्या विशेष तपास युनिट (SIU) पथकाने महसूल विभागाच्या अधिकार्यांसह, आतरबुग लालपोरा, दिवार लोलाब येथील दहशतवादी अलमासच्या तीन मालमत्ता जप्त केल्या. अलमास हा मुकाम-ए-शरीफ डार गावचा रहिवासी आहे. 1990 मध्ये सुरक्षा दलांचा दबाव वाढल्याने तो आपला जीव वाचवण्यासाठी पाकिस्तानात पळून गेला. सुरुवातीला तो तेहरीक जिहाद-ए-इस्लामीचा दहशतवादी होता. तीन वर्षांपूर्वी तो टीआरएफमध्ये सामील झाला होता.
शस्त्रे आणि ड्रग्ज काश्मीरमध्ये पोहोचवण्याचे कामदहशतवादी अलमास हा फक्त स्वयंचलित शस्त्रांनी सज्ज असलेल्या दहशतवाद्यांना काश्मीरमध्ये सुरक्षितपणे घुसखोरी करण्यासाठी मदत करत नाही, तर आपल्या नेटवर्कद्वारे उत्तर काश्मीरमध्ये शस्त्रे आणि ड्रग्सची वाहतूक करत असल्याचे समोर आले आहे. तसेच, इंटरनेट मीडियाद्वारे तो काश्मीरमध्ये हिजबुल मुजाहिद्दीनसाठी नवीन कॅडर भरती करण्याच्या तयारीत सु्द्धा आहे.