जम्मू-काश्मीर : जम्मू काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यात भारतीय लष्काराचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. भारतीय जवानांनी काही दहशतवाद्यांना घेरल्याची माहिती आहे.
बारामुल्लाच्या सोपोरमध्ये दहशतवादी लपल्याची माहिती भारतीय जवानांना मिळाली होती. त्यानंतर गुरूवारी पहाटेपासूनच सुरक्षा रक्षकांनी परिसराची नाकेबंदी करण्यास सुरूवात केली. त्याचबरोबर, या जिल्ह्यामध्ये इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.
दरम्यान, काल जम्मू-काश्मीरमधील जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय मार्गावर झज्जर कोटलीजवळ नाकेबंदी सुरू होती. यावेळी वाहनांची तपासणी करताना दहशतवाद्यांनी पोलिसांवर गोळीबार केला. त्यानंतर दहशतवादी पसार झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांच्या शोध घेण्यासाठी आजच्या दिवशीही जवानाचे सर्च ऑपरेशन सुरु आहे. धक्कादायक बाब म्हणजे, काल पोलिसांना वाहनांची तपासणी करताना एका ट्रकमध्ये एक एके सीरिजमधील रायफल आणि 3 मॅगझिन्स सापडल्या आहेत. पोलिसांनी ट्रकच्या चालक आणि क्लिनरला ताब्यात घेतले आहे.