जम्मू-काश्मीर : जम्मू-काश्मीरच्या शोपियान जिल्ह्यात सुरक्षा दलाच्या जवानांना मोठे यश मिळाले आहे. या ठिकाणी सुरक्षा दल आणि दहशतवादी यांच्यात चकमक सुरु आहे. या चकमकीत सुरक्षा दलाच्या जवानांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. तसेच, अजून एक ते दोन दहशतवाद्यांनी सुरक्षा दलाच्या जवानांनी घेरले आहे. याशिवाय, परिसरात शोध मोहीम सुरू आहे.
गुप्तचर यंत्रणेची माहिती मिळाल्यानंतर लष्कराच्या 44 आरआर आणि सीआरपीएफच्या संयुक्त पथकाने जम्मू-काश्मीरच्या शोपियान जिल्ह्यात सुगु हेन्धामा भागात शोध मोहीम सुरू केली. यावेळी दहशतवाद्यांनी स्वत: ला घेरलेले पाहून सुरक्षा दलाच्या जवानांवर गोळीबार सुरू केला. दहशतवाद्यांच्या या गोळीबाराला जवानांनी चोख प्रत्युत्तरही दिले. ज्यामध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान, शोपियान जिल्ह्यात या आठवड्यातील ही तिसरी चकमक आहे. गेल्या दोन चकमकींमध्ये 9 दहशतवाद्यांच्या सुरक्षा दलाने खात्मा केला होता. याशिवाय, जानेवारी ते 8 जून या सहा महिन्यांमध्ये सुरक्षा दलांनी तब्बल 101 दहशतवाद्यांचा खात्मा केला.
याचबरोबर, सुरक्षा दलांनी आणखी 125 दहशतवाद्यांची हिट लिस्ट तयार केली असून त्यात त्यात 25 विदेशी दहशतवाद्यांचा समावेश आहे, अशी माहिती लष्कराच्या 15व्या कोअर कमांडचे नेतृत्व करणारे लेफ्टनंट जनरल बी.एस.राजू यांनी दोन दिवसांपूर्वी दिली आहे.