नूह हिंसाचारावेळी हतबल झालेले पोलीस आता कारवाई करू लागले आहेत. दोन आरोपींना पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांनी आरोपी पळून जाऊ लागल्याने गोळीबार केला. यामध्ये एका आरोपीच्या पायाला गोळी लागली आहे. आरोपीला जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
चकमकीनंतर पोलिसांनी मुनसैद आणि सैकुल या दोन आरोपींना अटक केल्याचे सांगण्यात येत आहे. या चकमकीत सैकुलच्या पायाला गोळी लागली आहे. 31 जुलै रोजी हरियाणातील मेवात-नूह येथे ब्रिज मंडळ यात्रा काढण्यात आली. यादरम्यान यात्रेवर दगडफेक झाली. काही वेळातच त्याचे दोन समुदायांमध्ये हिंसाचारात रूपांतर झाले. शेकडो गाड्या पेटवल्या गेल्या.
पोलिसांवरही हल्लेखोरांनी हल्ला केला होता. नुहनंतर सोहना येथेही दगडफेक आणि गोळीबार झाला. वाहने जाळण्यात आली. यानंतर हिंसाचाराची आग नुहपासून फरीदाबाद-गुरुग्रामपर्यंत पसरली. नुह हिंसाचारात दोन होमगार्डसह 6 जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे आता पोलीस कारवाई करू लागले आहेत.
नूह, फरीदाबाद, पलवलसह अनेक ठिकाणी इंटरनेट बंद करण्यात आले. याशिवाय नूहमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली होती. नूहमध्ये आतापर्यंत 140 हून अधिक एफआयआर नोंदवण्यात आले आहेत. तर 300 हून अधिक लोकांना अटक करण्यात आली आहे.