श्रीनगर - जम्मू-काश्मीरच्या शोपियानमध्ये जवान आणि दहशतवाद्यांमध्ये बुधवारी ( 27 फेब्रुवारी) सकाळी चकमक सुरू झाली आहे. या चकमकीदरम्यान जैश ए मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे. परिसरात काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली असल्याने शोधमोहीम सुरू आहे.
सीमारेषेवर पाकिस्तानच्या कुरापती दिवसेंदिवस वाढत आहेत. सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये पहाटेपासून शोपियाँतील मेमरेंड परिसरात चकमक सुरू झाली शोपियानमध्ये काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. त्यामुळे जवानांनी या परिसराला घेराव घातला. त्यानंतर परिसरात शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे. यावेळी दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे.
सीमारेषेवर तणाव वाढला, भारतीय सैन्याकडून पाकिस्तानच्या 5 चौक्या उद्धवस्तपुलवामा हल्ल्याचा बदला भारतीय हवाई दलाने घेतला असून यामुळे गर्भगळीत झालेल्या पाकिस्तानने आता एलओसीवरील नागरिकांच्या घरांचा आसरा घेण्यास सुरुवात केली आहे. घरांआडून पाकिस्तानचे सैनिक शस्त्रसंधीचे उल्लंघन करत असून भारतीय जवानांवर गोळीबार आणि ग्रेनेड हल्ले करत आहेत. यामध्ये भारताचे 5 जवान जखमी झाले आहेत. तर पाकिस्तानच्या 5 चौक्या उद्धवस्त केल्या आहेत. नौशेरा आणि बारामुल्ला भागात हे हल्ले करण्यात आले.
भारताच्या हल्ल्यानंतर काल सायंकाळी 6.30 वाजल्यापासून एलओसीवर पाकिस्तानने 12 ते 15 वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन करत मोठी शस्त्रे डागली. यामध्ये उखळी तोफा आणि मिसाईलचाही समावेश होता. भारतीय जवानांच्या प्रत्युत्तरापासून वाचण्यासाठी पाकच्या लष्कराने एलओसी लगतच्या नागरिकांच्या घराचा आधार घेतला असून नागरी वस्ती असल्यामुळे भारतीय जवानांकडून केवळ पाकच्या चौक्यांवरच गोळीबार केला जात आहे. या नागरिकांना पाकिस्तानने ढाल बनविले असून यामुळे भारताचे 5 जवान जखमी झाले आहेत. तीन जणांना किरकोळ जखमा झाल्या असून दोघांना हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले आहे.
मंगळवारी भारतीय हवाई दलाच्या १२ मिराज-२000 विमानांनी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास पाकच्या हवाई हद्दीत प्रवेश केला आणि बालाकोट, चाकोटी व मुझफ्फराबाद येथील दहशतवाद्यांच्या तळांवर बॉम्बहल्ले केले. हे हल्ले २१ मिनिटे सुरू होते. या हल्ल्याने बालाकोटचा सारा परिसर हादरून गेला. तिन्ही दहशतवादी तळ जंगलांमध्ये होते. आसपासच्या गावांतील लोक घाबरून बाहेर आले. त्यांनी स्फोटांचे प्रचंड आवाज येत असल्याची माहिती पोलिसांना दिली. मात्र, पोलीस येईपर्यंत भारतीय हवाई दलाने आपली मोहीम फत्ते करून विमाने परतलीही होती.या हल्ल्यात ३२५ दहशतवादी आणि त्यांचे २५ कमांडर ठार झाले. तब्बल ४८ वर्षांनी भारतीय हवाई दलाने नियंत्रण रेषा ओलांडून ही कारवाई केली. या हवाई हल्ल्यामुळे पाकिस्तान भेदरला असून नागरिकांमध्ये प्रचंड घबराट पसरली आहे. तब्बल ४८ वर्षांनी प्रत्यक्ष नियंत्रण रेषा हवाई दलाच्या जवानांनी ओलांडली आहे. यापूर्वी माजी पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांनी १९७१ साली अशी कारवाई केली होती आणि त्यातूनच बांगलादेश स्वतंत्र झाला होता.