ऑनलाइन लोकमत
ह्यूस्टन, दि. 1 - कॅनसस शहरात अमेरिकी नागरिकाने मूळच्या हैदराबादच्या अभियंत्याची गोळ्या घालून हत्या केल्यामुळे अनिवासी भारतीयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. श्रीनिवास कुचीभोटलावर गोळी झाडण्यापूर्वी हल्लेखोराने माझ्या देशातून चालता हो असे म्हटले होते. शहरात गजबजलेल्या बारमध्ये झालेल्या या घटनेत दोन जण जखमी झाले. आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेचा भारतीयांनी चांगलाच धसका घेतला असून सर्वजण भीतीच्या छायेखाली जगत आहेत. आपल्यावरही कोणीतरी अचानक येऊन असाच गोळीबार करेल याची भीती भारतीयांना सतत वाटत आहे.
सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकजण आपली भीती व्यक्त करत असताना काही फोटो, व्हिडीओदेखील व्हायरल होत आहेत. असाच एक फोटो सध्या व्हायरल होत आहे ज्यामधून अमेरिकेतील भारतीयांची मनस्थिती काय आहे याचा अंदाज लावला जाऊ शकतो. या फोटोमध्ये एका टी-शर्टवर इंडियन असं लिहिलं असून खाली व्हिसा संपायला अजून तीन महिने बाकी आहेत, कृपया गोळ्या घालू नका असं सांगण्यात आलं आहे. अमेरिकेतील परिस्थिती नाजूक असून हे या फोटोतून भारतीयांच्या मनात काय खलबतं चालू असेल याचा अंदाज येत आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी अखेर दर्शवला निषेध -
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कन्सास येथे झालेल्या भारतीय इंजिनिअरची हत्येचा बुधवारी अखेर निषेध व्यक्त केला आहे. आमच्या देशात वर्णद्वेष किंवा वर्णभेदला जागा नाही, अशी प्रतिक्रिया देत ट्रम्प यांनी निषेध नोंदवला.
वर्णद्वेषाने झालेला हा हल्ला काही पहिलाच नाही. याआधीही असे हल्ले झाले आहेत.
याच महिन्यामध्ये तेलंगणातील मामीदाला वामसी रेड्डी या विद्यार्थ्याची कॅलिफोर्निया येथे गोळी घालून हत्या करण्यात आली होती. नोव्हेंबर २०१६ मध्ये एक १७ वर्षाच्या शीख मुलाची हत्या करण्यात आली होती. गुर्नूर सिंग नहाल हा किशोरवयीन एका गॅरेजमध्ये काम करत होता. तो घरी परतण्याच्या तयारीत होता. त्याच वेळी गोळी झाडून त्याची हत्या करण्यात आली. ही घटना देखील अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथेच झाली होती.
ऑगस्ट २०१५ मध्ये शाओलीन चंदम या मूळच्या मणिपूरच्या तरुणाची व्हर्जिनया येथे हत्या करण्यात आली होती. त्याचा एका अमेरिकन नागरिकासोबत किरकोळ वाद झाला होता. त्यातूनच ही हत्या झाली होती. २०१५ हे वर्ष भारतीय वंशाच्या लोकांसाठी अमेरिकेत दुर्दैवी ठरले. फेब्रुवारी महिन्यात दोन घटना आणि जून, जुलै, ऑगस्ट मध्ये प्रत्येकी एक घटना या वर्षात घडली होती. जुलै २०१५ मध्ये एका ज्येष्ठ नागरिकावर न्यू जर्सीमध्ये हल्ला झाला. त्या व्यक्तीचे दात पडेपर्यंत त्यास मारहाण करण्यात आली होती. मारहाण केल्यानंतर हल्लेखोरांनी पळ काढला. हा हल्ला वंशभेदतूनच झाल्याचे म्हटले गेले होते.
जून २०१५ मध्ये अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या एका २३ वर्षीय विद्यार्थ्याला त्याच्या अपार्टमेंट बाहेरच गोळी घालून ठार करण्यात आले होते. तो विद्यार्थी अटलांटिस विद्यापीठात उच्च शिक्षण घेत होता. २०१५ फेब्रुवारीमध्ये एका ज्येष्ठ नागरिकाला पोलिसांनी मारले होते. हे ज्येष्ठ नागरिक वारंवार सांगत होते, की आपले घर जवळ आहे आणि आपणास इंग्रजी येत नाही. पंरतु त्यांना मारहाण करण्यात आली त्यामध्ये ते गंभीर झाले. त्यांना पक्षघाताने ग्रासले. फेब्रुवारीमध्ये अमेरिकेच्या वेस्ट कोस्टमध्ये हिंदू मंदिराच्या भिंतीवर गेट आउट असे लिहिण्यात आले होते. या मंदिराची नासधूस देखील करण्यात आली होती. कोलंबिया या प्रतिष्ठित विद्यापीठात प्राध्यापकाचे काम करणाऱ्या शीख व्यक्तीवर हल्ला करण्यात आला होता. ३० लोकांनी मिळून त्यांच्यावर हल्ला केला होता. त्यांना ओसामा-ओसामा असे देखील त्या जमावाने म्हटले होते.