विटभीच्या खड्ड्यात चिमुकल्याचा अंत (सुधारित)
By admin | Published: June 26, 2015 1:05 AM
नागपूर : विटभी परिसरातील खड्ड्यात पडल्याने एका चिमुकल्याचा करुण अंत झाला. लक्ष मनोहर शाहू असे त्याचे नाव आहे. सात वर्षीय लक्ष हा धम्मदीपनगरातील रहिवासी होता. गुरुवारी सकाळी ११.३० ला यशोधरानगरात ही घटना घडली.
नागपूर : विटभट्टी परिसरातील खड्ड्यात पडल्याने एका चिमुकल्याचा करुण अंत झाला. लक्ष मनोहर शाहू असे त्याचे नाव आहे. सात वर्षीय लक्ष हा धम्मदीपनगरातील रहिवासी होता. गुरुवारी सकाळी ११.३० ला यशोधरानगरात ही घटना घडली. पाचपावली, यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अनेक अवैध विटभट्ट्या आहेत. बळजबरीने बसविण्यात आलेल्या काही विटभट्टीच्या मालकांकडून परिसरात मोठमोठे खड्डे खोदण्यात आलेले आहेत. या ठिकाणी मजुरांचे शोषण होते. अनेकदा रात्रीच्या वेळी नको ते प्रकारही घडतात. या ठिकाणी मजुरांच्या सुरक्षेच्या कोणत्याही उपाययोजना नसतात. त्यामुळे महिला मजुरांच्या सोबत असलेल्या लहान मुलांसोबत नेहमीच छोटे-मोठे अपघात घडतात. पोलीस आणि महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना विटभट्टी चालविणाऱ्याकडून नियमित मोठी देण मिळते. त्यामुळे या ठिकाणावरील गैरप्रकाराकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जाते. गुरुवारी सकाळी असेच झाले. खड्ड्यात विटा बनविण्यासाठी काळी चिकन माती आणि पाणी टाकले जाते. त्यामुळे त्या खड्ड्यात एकप्रकारची दलदलच तयार होते. अशाच एका खड्ड्यात पडून लक्ष याचा करुण अंत झाला. त्याची आई संगीता मनोहर शाहू (वय २९) यांच्या माहितीनुसार गुरुवारी सकाळी ११.३० ला तो यशोधरानगरातील विटभट्ट्यांच्या पाण्याच्या खड्ड्यात पडला. त्याला बाहेर काढून मेयोत नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. या घटनेमुळे परिसरात तीव्र शोककळा पसरली. यशोधरानगर पोलिसांनी संगीता यांच्या तक्रारीवरून अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.----यापूर्वीही घडली अशीच घटना ऑक्टोबर २०१३ मध्ये एका विटभट्टीजवळ अशीच एक घटना घडली होती. त्यावेळी रहिस ऊर्फ कालू मोहम्मद जमील अन्सारी (वय १४) या बालकाचा खड्ड्यात पडून मृत्यू झाला होता. पोलिसांनी हे प्रकरण तेव्हा दडपण्याचे प्रयत्न केले होते. मात्र, लोकमतने त्यावेळी हे प्रकरण उचलून धरले. त्यामुळे विटभट्टी मालकावर गुन्हा दाखल झाला होता.