ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २६ - न्यूक्लियर सप्लायर ग्रुप म्हणजेच एनएसजी देशांच्या गटाचे सदस्यत्व मिळवण्यात अपयश आलेल्या भारताला पुन्हा एकदा या गटाचे सदस्यत्व मिळवण्याची संधी आहे. वर्षअखेरीस पुन्हा एकदा एनएसजी देशांची बैठक होण्याची शक्यता आहे.
या बैठकीत अणवस्त्र प्रसार बंदी करारावर स्वाक्षरी न करणा-या देशांना संघटनेत कसे सामावून घेता येईल यावर चर्चा होणार आहे. त्यामुळे भारताला पुन्हा एकदा एनएसजी सदस्यत्वाची संधी आहे. चीन आणि अन्य देशांच्या विरोधामुळे शुक्रवारी सेऊलमध्ये झालेल्या बैठकीत भारताला या गटाचे सदस्यत्व मिळाले नाही.
भारताने अणवस्त्र प्रसारबंदी करारावर स्वाक्षरी केलेली नाही त्या आधारावर भारताला सदस्यत्व नाकारण्यात आले. मेक्सिकोने या करारावर स्वाक्षरी न करणा-या देशांना एनएसजीमध्ये कसे सामावून घेता येईल त्यावर चर्चा करण्यासाठी पुन्हा बैठक करण्याचा सल्ला दिला. त्यामुळे यावर्ष अखेरीस पुन्हा बैठक होईल.
एनएसजीमध्ये एकूण ४८ देश असून, इथे नव्या देशाला सदस्यत्व देण्याचा निर्णय बहुमताने होत नाही तर, त्यासाठी सर्व सदस्य देशांचा होकार लागतो. या गटात स्थान मिळाल्यास आधुनिक अणूऊर्जा तंत्रज्ञान मिळवण्याचा आणि आपले तंत्रज्ञान निर्यात करण्याचा भारताचा मार्ग मोकळा होईल.