ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 5 - पश्चिम बंगालमधील नॉर्थ 24 परगणा येथे सुरु असलेल्या जातीय हिंसाचाराची केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी दखल घेतली आहे. राजनाथ सिंह यांनी गृहसचिवांना बदुरियामधील परिस्थितीवर सतत लक्ष ठेवण्याची सूचना केली आहे. दरम्यान मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि राज्यपाल केशरी नाथ त्रिपाठी यांच्यात सुरु असलेल्या वादात मध्यस्थी करत भांडण संपवण्यास सांगितलं आहे. राजनाथ सिंह यांनी ममता बॅनर्जी आणि राज्यपाल केशरी नाथ त्रिपाठी यांच्याशी बातचीत केली असून आपल्यातील वाद मिटवा असं सांगितलं आहे.
आणखी वाचा -
एका 17 वर्षीय विद्यार्थ्यांने फेसबूकवर धार्मिक स्थळासंबंधी पोस्ट केल्याने जातीय तणाव निर्माण झाला आहे. हा विद्यार्थी बदुरिया येथील राहणार आहे. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. राजनाथ सिंह यांनी ममता बॅनर्जीना याप्रकऱणी अहवाल सादर करण्याचा आदेश दिला आहे.
Home Minister Rajnath Singh has directed Home Secretary to monitor developments after violence broke out in West Bengal"s Baduria— ANI (@ANI_news) July 5, 2017
एका फेसबूक पोस्टमुळे पश्चिम बंगालमध्ये जातीय हिंसाचार सुरु झाला आहे. परिस्थिती हाताबाहेर चालली असून केंद्राने सीमा सुरक्षा दलाच्या जवानांना सुरक्षेसाठी पाठवलं आहे. नॉर्थ 24 परगणा येथील ही घटना आहे. शुक्रवारी ही फेसबूक पोस्ट करण्यात आली होती. त्यानंतर नॉर्थ 24 परगणा जिल्ह्यात अनेक ठिकाणी दंगलसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. अनेक ठिकाणी लोकांनी एकमेकांवर हल्लेही केले असल्याची माहिती मिळाली आहे.
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना राज्यपाल केशरी नाथ त्रिपाठी यांनी फोन करुन परिस्थितीची माहिती घेतली होती. फोनवरुन बातचीत झाल्यानंतर ममता बॅनर्जी यांनी राज्यपाल एखाद्या भाजपा नेत्याप्रमाणे माझ्याशी बोलत असल्याचा आरोप केला होता. "मला खूपच अपमानास्पद वाटलं. पदाचा त्याग करण्याचा विचारही माझ्या मनात आला होता", असं ममता बॅनर्जी बोलल्या होत्या.
यावर प्रतिक्रिया देताना राज्यपाल केशरी नाथ त्रिपाठी यांनी आपण ममता बॅनर्जीशीं बोलताना त्यांचा अपमान होईल असं काहीच बोललो नसल्याचा दावा केला होता.
दुसरीकडे भाजपाने बदुरिया हिंसाचारात केंद्राने दखल घेण्याची मागणी केली आहे. नॉर्थ 24 परगणा जिल्ह्यात दोन हजाराहून जास्त मुस्लिमांनी हिंदू कुटुंबावर हल्ला केला असल्याचा दावा भाजपाने केला आहे. आपल्या कार्यालयांनाही जाणुनबुजून आग लावण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
Plz don"t heed rumours. Morphs on social media are more vicious. City is peaceful. Report rumour-mongers at 100. Help us in keeping peace.— Kolkata Police (@KolkataPolice) July 4, 2017
परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली असून संतप्त जमावाने अनेक ठिकाणी रस्ते जाम केले होते. तसंच इतर जाती, धर्मातील लोकांवरही हल्ले होत असून, दुकानांची जाळपोळ करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. सोमवारी जमावाने कोलकाताजवळील अनेक ठिकाणी रस्ते आणि रेल्वेमार्गावर चक्का जाम आंदोलन केलं. कोलकातापासून 70 किमी अंतरावर सुरु झालेलं आंदोलन इतर ठिकाणी पसरत असून आता नॉर्थ 24 परगणा जिल्ह्यात पोहोचलं आहे.
दरम्यान पोलिसांनी ट्विटरच्या माध्यमातून लोकांना अफवा न पसरवण्याचं तसंच शांतता राखण्याचं आवाहन केलं आहे. "कृपया अफवा पसरवू नका. सोशल मीडियावरील खोटे मेसेज पसरवणे धोकादायक ठरु शकतं. आपलं शहर शांततामय असून ते राखण्यास मदत करा. संशयित गोष्ट आढळल्यास 100 क्रमांकावर संपर्क साधा" असं पोलिसांनी ट्विट केलं आहे. दरम्यान जातीय हिंसाचारानंतर सुरक्षेच्या दृष्टीकोनातून बदुरिया येथील इंटरनेट सेवा ठप्प करण्यात आली आहे.