ऑनलाइन लोकमत
दुबई, दि. ११ - भारताची अव्वल महिला बॅडमिंटनपटू सायना नेहवालचे अखेर शुक्रवारी बीडब्लूएफ सुपरसिरीज स्पर्धेत आव्हान संपुष्टात आले. राऊंड रॉबिन पध्दतीने खेळवण्यात येणा-या या स्पर्धेच्या तिस-या सामन्यात चीनच्या ताई सू यिंगने सायनावर २१-१६, १८-२१, १४-२१ असा विजय मिळवला.
सलामीच्या सामन्यात सायनचा जपानच्या नोझोमी ओकुहाराकडून पराभव झाला होता. त्यानंतर सायनाने दुस-या सामन्यात स्पेनच्या कॅरोलिना मारिनवर विजय मिळवून स्पर्धेतील आव्हान कायम ठेवले होते. आजच्या तिस-या सामन्यात या स्पर्धेची गतविजेती असणा-या यिंग विरोधात सायनाने पहिला गेम जिंकून चांगली सुरुवात केली होती. मात्र दुस-या गेममध्ये यिंगने सामन्यात पुनरागमन करत दुसरा गेम १८-२१ असा जिंकला.
तिस-या गेममध्ये यिंगने ९-४ अशी आघाडी घेतली. ही आघाडी कायम टिकवत तिसरा गेम तिने २१-१४ असा जिंकला आणि सायनाचे आव्हान संपुष्टात आले.