हिंदी महासागरामध्ये १७ मे रोजी चीनचे जहाज बुडाले आहे. या दुर्घटनेत ३९ लोक बेपत्ता झाले आहेत. त्यांचा शोध लागत नाहीय. यामुळे चीनने भारताकडे मदत मागितली होती. एलएसीवर तणाव असला तरी भारताने माणुसकीच्या नात्याने सर्व वाद बाजुला ठेवून चीनच्या मदतीला नौदलाला पाठविले आहे.
भारताजवळच्या समुद्रात हे जहाज बुडाले आहे. जशी चीनने मदत मागितली, तशी भारताने केप कोमोरिन नेव्हल बेसवरून P8I हे शोध घेणाऱ्या विमानाला उड्डाणाचे आदेश दिले. भारतीय नौदलाचे हे विमान भारतीय समुद्री क्षेत्रात १६६० किमी पर्यंत गेले होते. तिथेच चीनचे जहाज बुडाले होते. ही जागा मालदीवच्या थोडी पुढे आहे.
चीनच्या या बुडालेल्या जहाजामध्ये १७ चिनी, १७ इंडोनेशियन आणि ५ फिलीपिन्सचे नागरीक होते. चीनने जहाज कुठे बुडाले याचे लोकेशनही भारताला पाठविले नव्हते. परंतू भारतीय नौदलाच्या विमानाने या जहाजाचे लोकेशन शोधून काढले आहे. तसेच जहाजातील तरंगणाऱ्या साहित्यावरही नजर ठेवली होती. महत्वाचे म्हणजे चीनने या जहाजाला शोधण्यासाठी आपल्या नौदलाच्या दोन जहाजांनाही तैनात केले होते. परंतू, त्यांना शोध लागला नव्हता.
चीनने मदतीसाठी ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, मालदीव, इंडोनेशिया, फिलिपिन्स व अन्य देशांमधील दुतावासांना सक्रीय केले होते. तसेच भारताकडे देखील निर्वाणीची मदत मागितली होती. भारतीय विमानाने चीनच्या जहाजांना बुडालेल्या जहाजापर्यंत पोहोचविले आणि मगच पुन्हा माघारी परतले.