ऑनलाइन लोकमत
रांची, दि. 7 - रस्त्यांवरच्या खड्ड्यांमुळे सामान्यांना होणारा त्रास नेमका काय असतो हे अभिनेते आणि भाजपा नेते शत्रुघ्न सिन्हा यांना नुसतच पाहायला नाही तर अनुभवायलाही मिळालं. रांचीहून जमशेदपूरला जात असताना रस्त्यांवरच्या खड्यांना वैतागलेल्या शत्रुघ्न सिन्हा यांनी थेट मुख्यमंत्री रघुबर दास यांना फोन करुन हेलिकॉप्टर पाठवण्याची विनंती केली. त्यानंतर शत्रुघ्न सिन्हा यांना जमशेदपूरहून एअरलिफ्ट करण्यात आलं.
शत्रुघ्न सिन्हा आपल्या पुस्तकाच्या प्रमोशनसाठी आले होते. रांचीहून जमशेदपूर असा 100 किमी प्रवास त्यांना करायचा होता. मात्र रस्त्यावरील खड्डे पाहून आपण रस्त्यावरुन प्रवास करु शकत नाही हे त्यांना जाणवलं. आपण रस्त्यावर जॉगिंग करत आहोत असं वाटत होतं अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. यानंतर त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांनी फोन लावला आणि प्रवासाची पर्यायी सोय करण्यास सांगितलं.
मुख्यमंत्री रघुबर दास यांनी तात्काळ हेलिकॉप्टकची सोय केली आणि आपल्या एका मंत्र्यालाही सोबत पाठवलं. केंद्राकडे अनेक वेळा विनंती करुनही रस्त्याची दुर्देशी तशीच आहे. आता आम्हालाही याची सवय झाली असल्याचं भाजपाच्याच एका मंत्र्याने सांगितलं आहे.