नवी दिल्ली - मध्य प्रदेशचे (Madhya Pradesh) ऊर्जा मंत्री प्रद्युम्न सिंह तोमर (Pradyuman Singh Tomar) हे आपल्या अनोख्या अंदाजामुळे नेहमीच चर्चेत असतात. त्यांची खास स्टाईल अत्यंत लोकप्रिय आहे. ते कधी रस्ता साफ करताना दिसतात, कधी सार्वजनिक टॉयलेट साफ करताना, तर कधी विजेच्या खांबावर चढून झाडं झुडपे साफ करताना दिसले आहेत. त्यांचा असाच मदतीसाठी पुढाकार घेण्याचा अंदाज पुन्हा एकदा पाहायला मिळत आहे. याच दरम्यान प्रद्युम्न सिंह तोमर यांनी ग्वाल्हेरची एक शाळा गाठली. येथील अस्वच्छता पाहून प्रथम शाळा व्यवस्थापनाला चांगलंच फटकारलं आहे.
ग्वाल्हेरचे जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त आणि डीईओ यांना बोलावून तोमर यांनी चांगलंच खडसावलं. यानंतर ऊर्जामंत्री तोमर यांनी स्वत: साफसफाई करण्याची जबाबदारी घेतली. त्यांनी स्वत: ब्रश आणि पाणी घेऊन शाळेचं टॉयलेट स्वच्छ केलं आहे. यासोबतच मुलांशी संवाद साधून स्वच्छतेचा संदेश दिला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राज्याचे ऊर्जा मंत्री प्रद्युम्न सिंह तोमर हे शुक्रवारी सरकारी कन्या माध्यमिक शाळेची पाहणी करण्यासाठी हजीरा परिसरात आले होते. जिथे त्यांनी शाळेतील विद्यार्थिनींशी संवाद साधला.
मंत्री महोदयांनी संपूर्ण टॉयलेट ब्रशने घासून केलं स्वच्छ
शाळेतील टॉयलेट अत्यंत अस्वच्छ असल्याचं यावेळी विद्यार्थिनींनी मंत्र्यांना सांगितलं. त्यामुळे त्यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. आत जाऊन पाहिलं तर टॉयलेट खूप घाण होतं. डास होते, हे पाहून ऊर्जामंत्री खूप संतापले. त्याचवेळी हे ऐकून ऊर्जामंत्री थेट शाळेच्या टॉयलेटमध्ये गेले. यावेळी शाळेतील टॉयलेट खरोखरच अस्वच्छ असल्याचं त्यांनी पाहिले. अशा परिस्थितीत कोणताही वेळ न घालवता त्यांनी स्वत:च्या हातानं टॉयलेट स्वच्छ करण्यास सुरुवात केली. जिथे मंत्री महोदयांनी संपूर्ण टॉयलेट ब्रशने घासून स्वच्छ केलं.
मंत्र्यांचा टॉयलेट साफ करतानाचा व्हिडीओ व्हायरल
मंत्र्यांचा टॉयलेट साफ करतानाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यासोबतच शाळांमधील टॉयलेट स्वच्छ करण्याच्या सूचनाही ऊर्जामंत्र्यांनी जिल्हाधिकारी आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांना दिल्या. त्याचवेळी तोमर म्हणाले की, ग्वाल्हेर जिल्ह्यातील सर्व सरकारी शाळांची टॉयलेट स्वच्छ झाली पाहिजेत. तोमर यांच्या कृतीचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.