नवी दिल्ली, दि. 5 - राष्ट्रीय जनता दलाचे (आरजेडी) प्रमुख लालूप्रसाद यादव यांची मुलगी मिसा भारती यांच्या दिल्लीमधील फार्महाऊसवर जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणी सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) ही कारवाई केली आहे. जप्तीची कारवाई करण्यात आली असल्याने मिसा भारती या फार्महाऊसचा कोणत्याही प्रकारे वापर करु शकत नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, या फार्महाऊसची किंमत जवळपास 30 ते 40 कोटी इतकी आहे. मिसा भारती यांनी काळा पैसा सफेद करत हे फार्महाऊस खरेदी केल्याचा आरोप आहे. सोबतच मिसा भारती आणि त्यांचे पती शैलेश कुमार यांनी हे फार्महाऊस खरेदी करण्यासाठी सुरेंद्र जैन आणि विरेंद्र जैन यांच्या जैन ब्रदर्स कंपनीचा वापर केल्याचाही आरोप आहे. याप्रकरणी ईडी गेल्या अनेक दिवसांपासून तपास करत होते.
करोडो रुपयांच्या बेनामी संपत्तीमुळे मिसा भारती आणि त्यांचे पती शैलेश कुमार गेल्या अनेक दिवसांपासून ईडीच्या रडारवर होते. काही दिवसापुर्वी ईडीने 8000 कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणी त्यांच्याविरोधात छापे टाकले होते. 8 जुलै रोजी ईडीने मिसा आणि शैलेश कुमार यांच्या दिल्लीमधील तीन ठिकाणी आणि संबंधित कंपनीवर छापा टाकला होता.
जैन बंधूंनी शेल कंपन्यांमार्फत कोट्यवधी रुपयांचा आर्थिक घोटाळा केला आहे. या बंधूंना मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत (पीएमएलए) अटक करण्यात आली आहे. मिसा भारती आणि शैलेश कुमार हे छापा घालण्यात आलेल्या मिशैल प्रिंटर्स अँड पॅकर्स प्रा. लिमिटेड या फर्मचे आधी संचालक होते. चार शेल कंपन्यांमार्फत या फर्मचे एक लाख २० हजार शेअर २००७-०८ मध्ये प्रत्येकी १०० रुपये दराने खरेदी करण्यात आले होते. हेच शेअर पुन्हा मिसा भारतीने पुन्हा प्रत्येकी १० रुपये दराने खरेदी केले होते, अशी माहिती ईडीने दिली.
दरम्यान, 8 हजार कोटींच्या बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी मिसा भारती यांचे सीए राजेश अग्रवाल याला सक्तवसुली संचालनालयाने आधीच बेड्या ठोकल्या आहेत. तसेच, सक्तवसुली संचालनालयाने राजेश अग्रवालला दिल्लीतील पटियाळा हाऊस न्यायालयासमोर हजर केले असता त्यांचे राजकीय पक्षांबरोबर संबंध असल्याचे समोर आले होते. प्राप्तिकर विभागाने दिल्ली आणि गुरुग्राम येथे लालूप्रसाद यादव यांच्याशी संबंधित कंपन्या अशा सुमारे 22 ठिकाणी छापे मारले होते. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार हे छापे 1 हजार कोटींच्या बेहिशेबी मालमत्तेच्या व्यवहाराच्या आरोपावरून मारण्यात आले होते. तसेच, गेल्या 15 वर्षांत डझनांहून अधिक बनावट कंपन्यांच्या माध्यमातून हजारो कोटी रुपयांचा काळा पैसा पांढरा केल्याचा आरोप आहे.