नवी दिल्ली: एकीकडे काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची भारत जोडो यात्रा सुरू असून, त्याला मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे सांगितले जात आहे. तर दुसरीकडे, नॅशनल हेराल्ड मनी लॉंड्रिंग प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने कारवाई करत तेलंगणमधील काँग्रेसच्या पाच नेत्यांना नोटीस बजावली आहे. या नेत्यांना दिल्लीत चौकशीसाठी उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
काही दिवसांपूर्वी ईडीने काँग्रेसच्या कर्नाटकचे प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांना पक्षाच्या मालकीच्या नॅशनल हेराल्ड वृत्तपत्रातील कथित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाच्या चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. डी. के. शिवकुमार यांची ७ ऑक्टोबर रोजी दिल्लीत चौकशी केली जाणार आहे. यापूर्वीही शिवकुमार यांची ५ तास ईडीकडून कसून चौकशी करण्यात आली होती. यानंतर आता ईडीने आता तेलंगणमधील काँग्रेसच्या ५ नेत्यांना नोटीस बजावली आहे.
काँग्रेसच्या नेत्यांनी दिली होती मोठी देणगी
राहुल गांधी आणि सोनिया गांधी हे यंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक असताना या नेत्यांनी त्यासाठी देणगी दिली होती. याच प्रकरणाचा तपशील जाणून घेण्यासाठी ईडीने या पाच नेत्यांना नोटीस बजावल्याचे सांगितले जात आहे. या नेत्यांमध्ये मोहम्मद अली शब्बीर, गीता रेड्डी, सुदर्शन रेड्डी, अंजन कुमार आणि गली अनिल यांचा समावेश आहे. तसेच अलीकडेच नॅशनल हेराल्ड वृत्तपत्राशी संबंधित यंग इंडियाचे कार्यालय सील करण्यात आले होते. त्यावेळी ते कार्यालय परवानगीशिवाय उघडू नये, अशा सूचनाही देण्यात आल्या होत्या.
दरम्यान, नॅशनल हेराल्ड प्रकरणी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि खासदार राहुल गांधी यांच्याही ईडीकडून चौकशी करण्यात आली आहे. आता तपास अधिकारी या प्रकरणाशी संबंधित अन्य व्यक्तींची तपासणी करत असल्याचे सांगितले जात आहे. दुसरीकडे राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. काही दिवसांनी ही यात्रा महराष्ट्रात येणार आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"