ED Raids: लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला काही दिवस राहिले आहेत. संपूर्ण देशात लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजत आहेत. राजकीय पक्ष, पदाधिकारी, नेते, कार्यकर्ते आपापल्या उमेदवाराचा सक्रीय होऊन प्रचार आणि प्रचार करताना दिसत आहेत. यातच आता सक्तवसुली संचालनालय म्हणजेच ईडी सक्रीय झाल्याचे पाहायला मिळत आहे. ईडीने देशभरातील पाच शहरांमध्ये छापेमारी केली असून, यातून २.५४ कोटींची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. विशेष म्हणजे एके ठिकाणी केलेल्या छापेमारीत चक्क वॉशिंग मशीनमध्ये नोटांची बंडले लपवून ठेवल्याचे उघडकीस आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ईडीने दिल्ली, हैदराबाद, मुंबई, कुरुक्षेत्र आणि कोलकाता येथे धाडी टाकल्या आहेत. परकीय चलन उल्लंघन प्रकरणी ईडीने कॅप्रिकॉर्न शिपिंग अँड लॉजिस्टिक प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक विजय शुक्ला आणि संजय गोस्वामी यांच्या ठिकाणी छापेमारी करण्यात आली आहे. या टाकलेल्या धाडीत २.५४ कोटींची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. तसेच काही कागदपत्रे आणि डिजिटल उपकरणे ताब्यात घेण्यात आली आहेत. तसेच यासंबंधित ४७ बँक खाती गोठवण्यात आली आहेत.
सिंगापूर येथील कंपन्यांना १८०० कोटी पाठवले
कंपनीचे संचालक आणि पार्टनर संदीप गर्ग, विनोद केडिया यांच्याशी संबंधित काही ठिकाणीही धाड टाकण्यात आली. यामध्ये लक्ष्मीटन मेरिटाइम, हिंदुस्थान इंटरनॅशनल, राजनंदिनी मेटल्स लि., स्टवार्ट अलॉयज इंडिया प्रा. लि., भाग्यनगर लि., विनायक स्टील्स लि., वशिष्ठ कन्स्ट्रक्शन प्रा. लि. आदींचा समावेश आहे. या ठिकाणांवर छापेमारी केव्हा करण्यात आली याचा खुलासा ईडीकडून करण्यात आलेला नाही. सिंगापूरच्या गॅलेक्सी शिपिंग अँड लॉजिस्टिक आणि हॉरिझॉन शिपिंग अँड लॉजिस्टिक या कंपन्यांच्या मदतीने तसेच FEMA कायद्याचे उल्लंघन करून भारताबाहेर परकीय चलन पाठवण्यात या कंपन्या सामील आहेत. तसेच या कंपन्याचे व्यवस्थापन अँथनी डी सिल्वा यांच्या वतीने केले जाते. शेल कंपन्यांच्या मदतीने सिंगापूर येथील कंपन्यांना १८०० कोटी रुपये पाठवण्यात आले, असा दावा करण्यात येत आहे.
दरम्यान, सिंगापूर येथील कंपनीला पैसे पाठवण्यासाठी मेसर्स नेहा मेटल्स, मेसर्स अमित स्टील ट्रेडर्स, मेसर्स ट्रिपल एम मेटल अँड अलॉयज, मेसर्स एचएमएस मेटल्स आदी बनावट कंपन्यांच्या मदतीने बनावट व्यवहार दाखविण्यात आले.