शिमला/चंदीगड/दिल्ली : केंद्रीय तपास यंत्रणा ईडीने भ्रष्टाचार संबंधित प्रकरणात हिमाचल प्रदेश आणि हरयाणातील अनेक जिल्ह्यांमध्ये छापे टाकले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, ईडीने पंजाब, हरयाणामधील १२ हून अधिक आणि हिमाचलमधील सोलन जिल्ह्यात छापेमारी केली आहे. हरयाणा अर्बन डेव्हलपमेंट अथॉरिटी विभागाशी संबंधित हे भ्रष्टाचाराचे प्रकरण आहे. ज्यामध्ये ईडी कारवाई करत आहे.
ईडीकडून अनेक ठिकाणी शोध घेतला जात असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. यामध्ये चंदीगड, पंचकुला, मोहाली आणि हरयाणातील इतर भागात सर्च ऑपरेशन राबवण्यात आले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, चुकीच्या पद्धतीने कोट्यवधी रुपयांचे बनावट रिफंड घेतल्याचे हे प्रकरण आहे. ही फसवणूक २०१५ ते २०१९ दरम्यान करण्यात आली होती. रिअल इस्टेटशी संबंधित अनेक कंपन्या आणि हरयाणातील अधिकारी या प्रकरणात रडारवर आहेत. दुसरीकडे, हरयाणा नागरी विकास प्राधिकरण विभागाशी संबंधित भ्रष्टाचाराचे प्रकरण हिमाचलशीही जोडले गेले आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हिमाचलमधील सोलन आणि बद्दी येथेही सर्च ऑपरेशन सुरु करण्यात आले आहे. अनेक सरकारी अधिकारी आणि काही निवृत्त अधिकाऱ्यांसह खासगी आरोपींच्या ठिकाणांवर ईडीची कारवाई सुरू आहे. तपास यंत्रणेच्या सूत्रानुसार, अनेक रिअल इस्टेट व्यावसायिक आता ईडीच्या रडारवर आले आहेत. यामध्ये सुनील कुमार गर्ग, मनोज पाल सिंगला, कंपनी सर्टेन फ्यूसर सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड, फॅब्युलस फ्यूचर प्रायव्हेट लिमिटेड, युनिसिटी कन्स्ट्रक्शन्स आणि इतर काही अज्ञात सरकारी आणि खाजगी आरोपींचा समावेश आहे.