नवी दिल्ली - भारतीय रेल्वे याचवर्षी जून महिन्यात विना इंजिन असणारी हायस्पिड ट्रेन लाँच करणार आहे. 160 किमी ताशी वेगाने धावणारी ही ट्रेन 18 जूनला ट्रॅकवर उतरवण्याची तयारी सुरु झाली आहे. या हायस्पिड ट्रेनला 'ट्रेन 18' असं नाव देण्यात आलं आहे. ही ट्रेन 2018 मध्ये लाँच होत असल्या कारणाने हे नाव देण्यात आलं आहे. या ट्रेनसाठी वापरण्यात आलेल्या तंत्रज्ञानाचा वापर करत अजून एका ट्रेनची निर्मिती करण्यात आली आहे. या ट्रेनला 'ट्रेन 20' नाव देण्यात आलं आहे. ही ट्रेन 2020 मध्ये ट्रॅकवर आणण्यात येणार असल्या कारणाने हे नाव देण्यात आलं आहे.
या दोन्ही ट्रेनची निर्मिती इंटीग्रल कोच फॅक्टरी (आयसीएफ) चेन्नईत केलं जात आहे. आयसीएफचे जनरल मॅनेजर सुधांशू मणी यांनी इंडियन एक्स्प्रेसशी बातचीत करताना याचवर्षी 18 जूनला ट्रेन ट्रॅकवर उतरवण्याची तयारी सुरु असल्याचं सांगितलं आहे. या ट्रेनचं वैशिष्ट्य म्हणजे यामध्यो लोकोमोटिव्ह इंजिन नसणार आहे. त्याच्या जागी ट्रेनच्या प्रत्येक डब्यात ट्रेक्शन मोटर्स लावलेले असतील, ज्यांच्या मदतीने सर्व डबे रुळावर धावतील. या ट्रेनचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे या ट्रेनसाठी स्टील वापरण्यात आलं आहे. संपुर्ण ट्रेन स्टीलने बनवण्यात आली आहे. ही पुर्णपणे स्वदेशी ट्रेन असून, याची संपुर्ण निर्मिती भारतात करण्यात आली आहे.
तसंच ड्रायव्हरचं केबिन दोन्ही दिशेला असणार आहे. याचाच अर्थ ही ट्रेन एकाच ट्रॅकवर पुढे-मागे अशा दोन्ही दिशेला धावू शकते. यामध्ये ट्रेनची दिशा बदलण्यासाठी इंजिन बदलण्याची गरज नसणार आहे. या ट्रेनच्या प्रत्येक डब्यात ट्रेक्शन मोटर्स लागलेले असतील, ज्यामुळे ट्रेन वेगाने धावणार आहे. आयसीएफच्या डिझायनर्सनी दिलेल्या माहितीनुसार, प्रत्येक डब्यात मोटर वापरण्याचं तंत्र संपुर्ण जगभरात अवलंबलं जात आहे. शताब्दी ट्रेनमधील डब्यांप्रमाणे 'ट्रेन 18' मध्येही सेकंड क्लास आणि प्रीमिअर फर्स्ट क्लास असे. दोन्हीही ठिकाणी स्वयंचलित दरवाजे असतील, तसंच मनोरंजनासाठी वाय-फाय सुविधा दिली जाणार आहे. 'ट्रेन 18' शताब्दी ट्रेन तर 'ट्रेन 20' राजधानी एक्स्प्रेसची जागा घेणार आहे. 'ट्रेन 20'चं वैशिष्ट्य म्हणजे हिची बॉडी अॅल्युमिनिअमची असणार आहे. 'ट्रेन 18'च्या एका डब्यासाठी जवळपास 2.5 कोटींचा खर्च आहे, तर 'ट्रेन 20'च्या एका डब्यासाठी 5.50 कोटींचा खर्च येणार आहे.