मुंबई : ‘हल्लीच्या तरुणांना समाजसेवेचे काहीच भान नाहीए. त्यांना केवळ स्वत:चं आयुष्य ऐशोआरामात घालवण्याची इच्छा आहे. आपलं समाजाप्रती काहीतरी कर्तव्य आहे याविषयी त्यांना काहीच देणंघेणं नसतं’, अशी ओरड वृद्धांकडून केली जाते. पण या वृत्तीला एका तरुणाने खोटं ठरवलं आहे. प्रत्येक तरुणाला अभिमान वाटेल असं काम याने केलं आहे. रस्त्यावर टॉवेल विकणाऱ्या एका थकलेल्या इसमाला त्याने अशाप्रकारे मदत केली ज्यामुळे तो आता सोशल मीडियावर हिरो बनला आहे.
आणखी वाचा - आजकालच्या मुलांना शिस्तीचं वावडं का?
फेसबुकवरील व्हायरल फॅक्ट्स इंडिया या पेजवरून एक पोस्ट शेअर करण्यात आली. या पोस्टनुसार एक उच्चशिक्षित तरुण रस्त्यावर टॉवेल विकत होता. विविध ग्राहक आकर्षित व्हावे यासाठी तो विविध भाषांमध्ये ग्राहकांशी संवाद साधत होता. त्याची बोलण्याची शैली, संवाद साधण्याचं कौशल्य, मार्केटींग करण्याची कला हे सारं सुशिक्षित व्यक्तीसारखं होतं. या मुलाकडे एवढं कौशल्य आहे तर हा मुलगा रस्त्यावर उभा राहून टॉवेल का विकतोय असा प्रश्न तिथून जाणाऱ्या एका इसमाला पडला. त्या इसमाने त्याची ही शंका त्या तरुणापुढे मांडली. तेव्हा एक भयानक सत्य बाहेर आलं.
या तरुणाचं नाव आदित्य. आदित्यने सांगितल्यानुसार तो एका सुप्रसिद्ध एमएनसी कंपनीत अभियांत्रिक म्हणून काम करतोय. तिकडे त्याला चांगला पगारही आहे. पण त्याने रस्त्यावर एक थकलेला वृद्ध टॉवेल विकताना दिसला. त्यामुळे या तरुणाला त्या इसमाची फार दया आली. आदित्यने त्या वृद्ध इसमाला काही पैसे देऊ केले. मात्र ते वृद्ध इसम इतके तत्वनिष्ठ होते, की त्यांनी फुकटचे पैसे स्विकारले नाहीत.
आणखी वाचा - या तरुणाने घेतली मुंबईकर महिलांच्या सुरक्षिततेची शपथ
पण आदित्यला त्यांच्यासाठी काहीतरी करण्याची फार इच्छा होती. तेव्हा त्याने ठरवलं की त्यांच्याकडे असलेले टॉवेल आपण विकले तर त्यांना थोडीफार मदत होईल. त्यामुळे त्याने त्याच्या शैलीने टॉवेल विकण्यास सुरुवात केली. त्याला विविध भाषा येत असल्याने तो ग्राहकांशी त्यांच्या भाषेत संवाद साधत होता. त्यामुळे टॉवेल चटकन विकले गेले आणि नेहमीपेक्षा त्या इसमाचा व्यवसाय जास्त झाला.
आणखी वाचा - जिथं आपली गरज आहे, तिथं वर्षभर तर काम करायला हवं. म्हणून मी जाईन दुर्गम भागात!
ही बातमी फेसबुकवर पोस्ट होताच अनेकांनी या तरुणाचं कौतुक केलं. असं प्रत्येक तरुणाने करायला हवं अशा कमेंट्सही केल्या आहेत. शिवाय अनेकांनी म्हटलं आहे की फक्त त्याचं कौतुक करण्यापेक्षा आपल्या आजूबाजूला असलेल्या अशा उपेक्षित वर्गाला, वृद्ध, गरजु व्यक्तीला मदत करणं प्रत्येकाचं काम आहे. त्यामुळे आपल्या आजूबाजूला असं कोणी दिसलं की या तरुणासारखं काम करायला विसरू नका.