नवी दिल्ली: एखादी छोटीशी चूकही कधी-कधी माणसाच्या जीवावर बेतू शकते. असाच काहीसा प्रकार ग्रेटर नोएडा एक्स्प्रेस वेवर पाहायला मिळाला. अभिषेक झा एका मित्रासोबत कारने ग्रेटर नोएडाकडे जात होते. यादरम्यान अभिषेकची कार रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकवर आदळली, त्यामुळे त्याला आपला जीव गमवावा लागला, तर त्याचा मित्र गंभीर जखमी झाला. कारमध्ये असलेल्या एका पाण्याच्या बाटलीमुळे हा अपघात झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिषेक कार चालवत असताना सीटच्या मागे ठेवलेली पाण्याची बाटली घसरली आणि अभिषेकच्या पायाजवळ आली. समोर ट्रक जवळ आल्याचे पाहून अभिषेकने कारवर नियंत्रण ठेवण्यासाठी ब्रेक लावले, मात्र ब्रेक पॅडलखाली बाटली असल्याने ब्रेक लावता आला नाही. यामुळे भरधाव वेगाने जाणारी कार ट्रकवर आदळली. यात वाहन चालवणाऱ्या अभिषेकचा जागीच मृत्यू झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिषेक त्याच्या मित्रासोबत शुक्रवारी रात्री रेनॉल्ट ट्रायबर या गाडीने नोएडाहून ग्रेटर नोएडाला निघाला होता. दरम्यान, सेक्टर 144 जवळ त्यांची भरधाव कार रस्त्याकिनारी उभी असलेल्या ट्रकवर धडकली. रिपोर्टनुसार, ब्रेक पॅडलखाली पाण्याची बाटली आल्याने हा अपघात झाला. अभिषेक झा ग्रेटर नोएडा येथील एका कंपनीत इंजिनिअर होते. त्यांच्या मृत्यूमुळे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दरम्यान, या अपघाताचा अधिक तपास पोलिस करत आहेत.