भोपाळ - नवरा-बायकोचं भांडण कोणत्या ना कोणत्या कारणावरुन होत असतं. मात्र मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये एक अजबगजब प्रकरण न्यायालयापर्यंत पोहचलं आहे. नवऱ्याने डोक्यावर शेंडी राखली म्हणून पत्नीने न्यायालयात पतीविरोधात घटस्फोटाची मागणी केली आहे. आई-वडिलांच्या मृत्यूनंतर नवऱ्याने डोक्यावर शेंडी राखण्याचा संकल्प केला. मरेपर्यंत डोक्यावरील शेंडी कापणार नाही अशी भूमिका नवऱ्याने घेतली. मात्र हीच शेंडी नवरा-बायकोमधील घटस्फोटाचं कारण बनलं आहे.
दोन वर्षापूर्वी नवऱ्याच्या आई-वडिलांचा मृत्यू रस्त्यावरील अपघातात झाला होता. या मृत्यूनंतर मुलाने धार्मिक परंपरेनुसार डोक्यावर शेंडी राखली. अनेक दिवस ही शेंडी नवऱ्याने कायम ठेवली, त्यानंतर शेंडी कापून टाकावी यासाठी बायकोने नवऱ्यावर दबाव आणला. या क्षुल्लक कारणावरुन हा वाद कौटुंबिक कोर्टाकडे पोहचला आहे. नवऱ्याने शेंडी राखल्याने तो अडाणी दिसतो असं बायकोचं म्हणणं आहे. तिच्या माहेरच्या माणसांकडून नवऱ्याची खिल्ली उडवली जाते. ज्यामुळे मला अपमानित व्हावं लागतं असं बायकोकडून याचिकेत म्हणण्यात आलं आहे.
कौटुंबिक न्यायालयाकडून हे प्रकरण समुपदेशनासाठी पाठवण्यात आलं आहे. या समुपदेशनानंतर दोघांमधील वादाचं मुळ कारण नवऱ्याने डोक्यावर शेंडी राखल्याचे आहे. नवऱ्याने शेंडी राखल्याने तो अशिक्षित दिसतो. तो माझ्या टाईपचा नाही असं बायको सांगते. मात्र नवरा इंजिनिअर तर बायको एमबीए पास आहे. समुपदेशक सरिता राजानी यांनी सांगितले की या दोघांचे लग्न 2 फेब्रुवारी 2016 रोजी झालं होतं.
या बायकोने समुपदेशकाला सांगितले की, जर नवऱ्याने त्याच्या डोक्यावरील शेंडी कापली तर हा वाद मिटेल. शेंडी ठेवल्याने नवऱ्याला सगळे पंडित म्हणू लागले आहेत. मात्र नवऱ्याने शेंडी कापणार नसल्याची भूमिका ठाम ठेवली आहे. माझी शेंडी मृत्यूनंतर शरीरासोबत जळेल असं नवरा सांगतो. तर बायकोला सर्व सुख दिलं आहे तरी माझ्या शेंडीमागे ती लागली आहे. या शेंडीमुळे बायको सहा महिने माहेरी राहिली. ही शेंडी कापा अन्यथा घटस्फोट द्या अशी भूमिका बायकोने घेतली आहे.