ऑनलाइन लोकमत -
विशाखापट्टणम, दि. 01 - नायजेरियामध्ये दोन भारतीय कर्मचा-यांचं अज्ञातांनी अपहरण केलं आहे. यामध्ये विशाखापट्टणममधील एका सिव्हिल इंजिनिअरचा समावेश आहे. 44 वर्षाय साई श्रीनिवास डोंगोटो प्रोजेक्ट सिमेंट कंपनीत काम करतात. आपल्या मित्रासोबत कामावर जात असताना काही लोकांनी त्यांचं अपहरण केलं आहे. डोंगोटो प्रोजेक्टमधील अधिका-यांनी विशाखापट्ट्णममधील त्यांच्या कुटुंबियांना याबाबत कळवलं आहे.
'डोंगोटो प्रोजेक्टमधील अधिका-यांनी मला माझे पती साई श्रीनिवास आणि त्यांचा मित्र अनिश शर्मा यांचं अपहरण झाल्याचं कळवलं आहे. कंपनीने भारतीय दुतावासाला याबाबत माहिती दिली असून स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार केल्याचंही सांगितलं आहे. खंडणीसाठी कोणताही फोन आलेला नाही त्यामुळे अपहरणाचा हेतू काय आहे ? याची काहीच कल्पना नसल्याचं', साई श्रीनिवास यांच्या पत्नी ललिता यांनी सांगितलं आहे.
परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी मात्र नायजेरियातील भारतीय दुतावासाला अपहरणाबद्दल काहीच माहिती नसल्याचं सांगितलं आहे. साई श्रीनिवास गेली 3 वर्ष डोंगोटो प्रोजेक्टसाठी काम करतात. नायजेरियामधील चिबोक शहरात ते राहत होते अशी माहिती ललिता यांनी दिली आहे.