बडोदा- गुजरातमधल्या इंजिनीअरिंगच्या दुस-या वर्षाला शिकत असलेल्या 19 वर्षांच्या विद्यार्थ्यानं आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे या विद्यार्थ्यानं मानसिक तणावातून नव्हे, तर भावाला किडनी मिळावी या उद्देशानं आत्महत्या केली असून, त्याचा उल्लेख त्या विद्यार्थ्यानं सुसाइड नोटमध्ये केला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याच्या भावाला किडनीचा त्रास होता. त्यासाठी भावाच्या किडनी प्रत्यारोपण करण्याचा सल्लाही डॉक्टरांनी दिला होता.नैतिककुमार तांडेल असं या विद्यार्थ्याचं नाव असून, बडोदातल्या वर्णामा इथल्या बाबारिया इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये तो इंजिनीअरिंगचं शिक्षण घेत होता. भावाला या त्रासातून मुक्त करण्यासाठी इंजिनीअरिंगचं शिक्षण घेणा-या या विद्यार्थ्यानं होस्टेलमध्ये गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याच्या अवयवांचा उपयोग त्याच्या भावासाठी करता आलेला नाही. नैतिकच्या सोबत राहणा-या विद्यार्थ्यानं पाहता क्षणी कॉलेज प्रशासन आणि पोलिसांनी आत्महत्येच्या वृत्ताची माहिती दिली.पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून चौकशी केली असता, त्या विद्यार्थ्याजवळ सुसाइड नोटही आढळली आहे. सुसाइड नोटमध्ये नैतिक लिहितो, मी माझ्या दोन्ही किडन्या भावाला देऊ इच्छितो. त्यासाठी मी आत्महत्या करत आहे. माझ्या दोन्ही किडन्या भावाला दिल्यानंतर इतर अवयवही गरजूंना दान करण्यात यावेत. या प्रकारानंतर नैतिकच्या वडिलांनी त्याचा मृतदेह किडनी प्रत्यारोपणासाठी डॉक्टरांकडे नेला असता, उशीर झाल्या कारणानं नैतिकच्या किडन्या भावाला दान करता येऊ शकत नसल्याचं डॉक्टरांनी स्पष्ट केलं. नैतिकचा मृतदेह मृत्यूनंतर 36 तासांनी मिळाला आहे. त्यामुळे त्याच्या शरीरातील अवयवांचं प्रत्यारोपण होऊ शकत नाही.
भावासाठी 'त्या' तरुणाने स्वत:चं आयुष्य संपवलं, पण...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2018 8:20 AM