नवी दिल्ली : संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा पहिला आठवडा विरोधी पक्षांच्या गदारोळात वाहून गेला. पहिल्या दिवशीप्रमाणेच शुक्रवारीसुद्धा संसदेच्या दोन्ही सभागृहात ललित मोदी प्रकरण आणि व्यापमं घोटाळ्याचे ढग कायम होते. सरकार आणि विरोधकांमधील कोंडी फुटू न शकल्याने कामकाज ठप्पच राहिले.इकडे विरोधकांच्या हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या सदस्यांनी सकाळी संसद भवन परिसरातील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमक्ष धरणे दिले.लोकसभेत सतत तिसऱ्या दिवशी गोंधळामुळे कुठलेही कामकाज होऊ शकले नाही. काळ्या पट्ट्या बांधून सभागृहात येऊ नका अशी ताकीद लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी दिली असतानाही काँग्रेसचे सदस्य काळ्या पट्ट्या बांधून आले होते. कामकाज सुरू होताच त्यांनी हातात फलक घेऊन नारेबाजी सुरू केली. त्यामुळे काही मिनिटातच अध्यक्षांना कामकाज तहकूब करावे लागले.राज्यसभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शाब्दीक चकमकी उडाल्यानंतर सुरुवातीला दोनदा आणि नंतर दिवसभरासाठी कामकाज स्थगित करण्यात आले. सकाळी कामकाज सुरू होताच काँग्रेसचे सदस्य प्रमोद तिवारी यांनी आपण ललित मोदीप्रकरणी स्थगन प्रस्ताव नोटीस दिली असल्याचे सांगितले. आणि भाजप नेत्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. सत्ताधाऱ्यांनी त्यांना तीव्र विरोध केला. विरोधकांमध्ये पीयूष गोयल, प्रकाश जावडेकर आदी केंद्रीय मंत्र्यांचाही समावेश होता. गोंधळातच संयुक्त जनता दलाचे अध्यक्ष शरद यादव यांनी सत्ताधारी पक्षाच्याच सदस्यांनी धरणे दिल्याचे यापूर्वी कधी घडले नसावे अशी टीका केली. विरोधी पक्ष नेते गुलाम नबी आझाद यांनीही त्यांना पाठिंबा देत सत्ताधारीच सभागृहाचे कामकाज चालू देत नसल्याचे साऱ्या देशाला कळेल, असे सांगितले. (लोकमत न्यूज नेटवर्क)
विरोधकांच्या गदारोळात आठवडा गेला वाहून
By admin | Published: July 25, 2015 1:13 AM