- शीलेश शर्मा
नवी दिल्ली : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी अभिनेते अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याने निर्माण झालेल्या वादात संपूर्ण काँग्रेस पटोले यांच्या पाठीशी उभा आहे.पक्षाचे सरचिटणीस रणदीप सुरजेवाला यांनी स्पष्ट केले की, काँग्रेस नेहमी अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या बाजूने उभा आहे आणि पटोले यांचे वक्तव्य त्यापेक्षा वेगळे नाही. कारण जेव्हा कलावंत स्वत: सरकारची भाषा बोलतो तेव्हा पटोले यांना चूक ठरवता येत नाही. ग्रेटा थनबर्गने केलेल्या ट्विटनंतर कलाकारांनी जी भाषा वापरली, जे शब्द ट्विटमध्ये वापरले त्यातून हे स्पष्ट होते की हे कलाकारही टीआरपीचा भाग बनले आहेत.पक्षाचे प्रवक्ते पवन खेडा यांनी पटोले यांचे समर्थन करताना म्हटले की, पेट्रोलचा भाव आकाशाला स्पर्श करीत आहे आणि गोदी मीडिया एक शब्द बोलत नसताना पटोले यांनी इशारा देऊन जनहिताचा मुद्दा व्यासपीठावर आणला. आज कमीत कमी मीडियाला पेट्रोलवर चर्चा करण्यास भाग पडले.