नवी दिल्ली/आदिलाबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देश हे त्यांचे कुटुंब आहे, असे प्रतिपादन केल्यानंतर गृहमंत्री अमित शाह आणि पक्षाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यासह भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी सोमवारी त्यांच्या सोशल मीडिया प्रोफाइलमध्ये ‘मोदी का परिवार’ हे शब्द जोडले.
राजद अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांनी कुटुंब नसल्याबद्दल पंतप्रधानांवर टीका केल्यानंतर भाजपने आपल्या सर्वोच्च नेत्याशी एकजूट दाखवत सोशल मीडिया प्रोफाइलमध्ये ‘मोदी का परिवार’ हे शब्द जोडले.
तेलंगणातील आदिलाबाद येथील सभेत मोदींनी सोमवारी देशातील “वंशवादी पक्षांवर” हल्ला चढवला आणि म्हटले की त्यांचे चेहरे भिन्न असू शकतात, परंतु ‘झूट आणि लूट” हे त्यांची समान प्रवृत्ती आहे. देशातील १४० कोटी जनता त्यांचे कुटुंब आहे. राजद नेते लालू प्रसाद यादव यांनी रविवारी पाटणा येथे विरोधी पक्षांच्या ‘इंडिया’ आघाडीच्या मेळाव्याला संबोधित करताना, घराणेशाहीच्या राजकारणाचा मुद्दा उपस्थित केल्याबद्दल मोदींवर टीका केली.
तेलंगणात ५६,००० कोटींच्या विकास प्रकल्पांचा प्रारंभ- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी तेलंगणातील ५६,००० कोटींहून अधिक किमतीच्या ऊर्जा, रेल्वे आणि रस्ते क्षेत्राशी संबंधित अनेक विकास प्रकल्पांची पायाभरणी केली, तर काही राष्ट्राला समर्पित केले. पंतप्रधानांनी इतर प्रकल्पांसह पेड्डापल्ली येथे एनटीपीसीचा ८०० मेगावॉट (प्रकल्प-२) तेलंगणा औष्णिक विद्युत प्रकल्प राष्ट्राला समर्पित केला.
- अल्ट्रा-सुपरक्रिटिकल तंत्रज्ञानावर आधारित, हा प्रकल्प तेलंगणाला ८५ टक्के वीजपुरवठा करेल आणि देशातील एनटीपीसीच्या सर्व ऊर्जा केंद्रांत तेथील वीजनिर्मिती क्षमता (अंदाजे ४२ टक्के) सर्वाधिक असेल.
- भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी म्हणाले की, विरोधी पक्ष गेल्या १६-१७ वर्षांपासून मोदींवर वैयक्तिक हल्ले आणि त्यांच्याविरोधात अशा ‘शूद्र’ टिप्पणी करत आहेत. लालू प्रसाद यादव यांची टिप्पणी दुःखद आणि वेदनादायक आहे.