नवी दिल्ली: भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात राफेल विमानं दाखल झाल्यापासून पाकिस्तानची झोप उडाली आहे. गेल्या आठवड्यात राफेल विमानांची पहिली तुकडी भारतात दाखल झाली. पाकिस्तान आणि चीनकडून असलेला धोका लक्षात घेता राफेल विमानं हवाई दलाच्या अंबाला तळावर तैनात करण्यात आली आहेत. BVRAAM मीटियर मिसाईलनं सज्ज असलेलं राफेल आशिया खंडातलं सर्वात शक्तिशाली लढाऊ विमान मानलं जात आहे.BVRAAM मीटियर मिसाईलनं सुसज्ज असलेल्या राफेल विमानांमुळे पाकिस्तानी हवाई दलाची सर्वच्या सर्व विमानं संकटात सापडली आहेत. गेल्या वर्षी भारतीय हवाई दलानं पाकिस्तानच्या बालाकोटवर हवाई हल्ले केले. त्यानंतर पाकिस्तान आणि भारतीय हवाई दलाची चकमक झाली. त्यात पाकिस्ताननं अमेरिकेकडून घेतलेल्या एफ-१६ विमानांचा वापर करून AIM-120 AMRAAM (ऍडव्हान्स मीडियम रेंज एअर टू एयर मिसाईल)च्या मदतीनं भारताचं मिग-२१ विमान पाडलं. भारतानंदेखील पाकिस्तानचं एक एफ-१६ विमान जमीनदोस्त केलं. मात्र चकमकीदरम्यान पाकिस्तानी हवाई दल भारताला कोणतीही संधी न देता अतिशय दुरून विमानांना लक्ष्य करत असल्यानं भारतीय हवाई दलाची चिंता वाढली. भारतीय हवाई दलातलं महत्त्वाचं विमान असलेल्या सुखोईवरही निशाणा साधण्यात आला. सुखोईनं AMRAAM पासून बचाव केला. पण सुखोईला पलटवार करता आला नाही. पाकिस्तानच्या एफ-१६ मधील AMRAAM मुळे भारताची चिंता वाढली होती. पाकिस्तानकडे आधी AMRAAM चं सुरुवातीचं मॉडेल AIM-120A/B विकत घेतलं. त्याची रेंज ७५ किमी होती. त्यानंतर पाकिस्ताननं १०० किमी रेंज असणारं AIM-120C-5 क्षेपणास्त्र खरेदी केलं. त्यामुळे पाकिस्तानी विमानं भारतीय विमानांना स्पॉट न करताही त्यांच्यावर हल्ले करू शकत होती. त्यामुळे भारतीय हवाई दलाला आक्रमण करण्याऐवजी बचावात्मक पवित्रा घ्यावा लागला होता.आता राफेलच्या आगमनामुळे पाकिस्तानचे धाबे दणाणले आहेत. राफेलमध्ये BVRAAM (बियॉण्ड विज्युअल रेंज एअर टू एअर मिसाईल) मीटियर यंत्रणा आहे. त्यामुळे पाकिस्तानसोबत संघर्ष झाल्यास एफ-१६ सह सर्वच्या सर्व लढाऊ विमानं संकटात सापडू शकतात. पाकिस्तानी हवाई दलातली जेएफ-१७ विमानं राफेलसाठी अत्यंत सोपी शिकार ठरू शकतात. त्यामुळेच राफेल भारतासाठी गेमचेंजर ठरू शकतं.
पाकिस्तानी लढाऊ विमानांचा संपूर्ण ताफा संकटात; 'त्या' एका घटनेनं शेजाऱ्यांची झोप उडाली
By ऑनलाइन लोकमत | Published: August 04, 2020 7:18 PM