गांधीनगर : सध्याच्या काँग्रेसजवळ महात्मा गांधींचे आदर्श नाहीत, असे गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी गुरुवारी एका मेळाव्यात सांगितले. निवडणुकांमध्ये भाजपा अनैतिकपणे वागत असल्याचा आरोप गुजरातकाँग्रेसकडून करण्यात आला, याला उत्तर मुख्यमंत्र्यांनी सुरेंद्रनगरजवळील लिंबडी येथील मोर्चात संबोधित करताना दिले. विजय रूपाणी यांनी बुधवारी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी प्रचार केला. यावेळी आज काँग्रेस महात्मा गांधींच्या गुणांपासून खूप लांब आहे. आजची काँग्रेस महात्मा गांधीची नाही तर फक्त राहुल गांधींची आहे, असे विजय रुपाणी म्हणाले.
टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, काँग्रेसच्या माजी आमदाराला २५ कोटी रुपयांना खरेदी केले आणि तिकिट दिले, असा आरोप काँग्रेसकडून भाजपावर करण्यात आला होता. यावर उत्तर देताना विजय रुपाणी यांनी म्हटले की, काँग्रेस आपल्या आमदारांचा सन्मान करत नाही आणि पक्ष सोडल्यानतंर असे आरोप केले जातात. तसेच, संपूर्ण गुजरात काँग्रेसला २५ कोटी रुपयांत खरेदी केले जाऊ शकते, असे विजय रुपाणी म्हणाले.
काँग्रेसवर निशाणा साधताना गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारवरही आरोप केले. कोरोनाची परिस्थिती हाताळण्यासाठी महाविकास आघाडी सरकार राम भरोसे असल्याचे विजय रुपाणी म्हणाले. महाराष्ट्रात कोरोना रूग्णांच्या उपचारासाठी रूग्णालयात बेड नव्हते आणि कोरोनामुळे मृत्यू झालेल्या लोकांचे मृतदेह अनोळखी सारखे फुटपाथवर पडले होते, असे विजय रुपाणी यांनी म्हटले.
याचबरोबर, विजय रुपाणी यांनी गुजरातमधील कोरोना स्थितीवर भाष्य केले. यावेळी गुजरातमध्ये जादा बेड उपलब्ध आहे. याठिकाणी बेड्सची कमतरता नाही. आम्ही कोरोना रुग्णांचा बरे होण्याचा दर ९० टक्के आणला आहे. तर मृत्यू दर २.२५ टक्के आहे, जो पुढे आणखी कमी होईल, असेही विजय रुपाणी यांनी सांगितले.