नवी दिल्ली : कोरोना व्हायरसमुळे देशभरात लॉकडाउन जाहीर करण्यात आले आहे. यावर उपाययोजना म्हणून अर्थमंत्र्यांनी हातावरचे पोट असलेल्या ८० कोटी गरिबांना १.७ लाख कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले आहे. यावर राहुल गांधी यांनी स्तुतीसुमने उधळी होती. सरकार योग्य मार्गावर असल्याचे म्हटले होते. आता लॉकडाउनमुळे निर्माण होणाऱ्या संकटाकडे राहुल गांधी यांनी मोदी सरकरचे लक्ष वेधले आहे.
राहुल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून लॉकडाउनचा निर्णय धोकादायक ठरू शकतो, असं म्हटले आहे. देशातील वयस्कर लोक मोठ्या प्रमाणात खेड्यात राहतात. संपूर्ण लॉकडाउनमुळे अर्थव्यवस्थेची चाक थांबली आहे. परिणामी शहरात काम करणारे युवक आणि कामगार पुन्हा खेड्याकडे परत निघाले आहेत. त्यामुळे कोरोनाचा धोका वाढला आहे. खेड्याकडे निघालेल्या युवकांचे आई-वडील, आजोबा-आजी खेड्यात राहतात. शहरातून निघालेले युवक न कळतपणे कोरोना व्हायरस गावाकडे घेऊन जाण्याची शक्यता आहे. यातून खेड्यातील जनतेच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे संपूर्ण लॉकडाउनला पर्याय काढावा, असा सल्ला राहुल गांधी यांनी मोदी सरकारला दिला आहे.
दरम्यान सरकारने परराज्यातील कामगारांसाठी पॅकेजची केलेली घोषणा कौतुकास्पद आहे. मात्र ही मदत तत्काळ जनतेपर्यंत पोहोचायला हवी, अस राहुल यांनी सांगितले. तसेच जाहीर केलेल्या पॅकेजचे वेळापत्रक जाहीर करण्याची विनंती राहुल यांनी केली आहे.
देशात लॉकडाउनची घोषणा केल्यापासून विविध राज्यातील कामगार स्थलांतर करत आहेत. रेल्वे आणि परिवहन यंत्रणा बंद असल्यामुळे अनेकजन पायी आपापल्या गावाकडे निघाले आहेत. त्यामुळे कोरोनाचा प्रसार होण्याची शक्यता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी चिंता व्यक्त केली असून सरकारला सूचक इशारा दिला आहे.