मनालीपृथ्वीवरील स्वर्ग म्हणून ओळख असलेल्या आणि पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या मनालीमध्ये कोरोना संदर्भात धक्कादायक माहिती समोर आली आहे. मनालीच्या लाहौल खोऱ्यातील थोरांग गावातील केवळ एक गावकरी वगळता इतर सर्वांचे कोरोनाचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत.
लाहौलमधील या बातमीने प्रशासन खडबडून जागं झालं आहे. यापार्श्वभूमीवर रोहतंग टनेलच्या उत्तर भागकडे पर्यटकांना जाण्यापासून रोखण्यात येत आहे. योसोबतच पर्यटकांना लाहौल खोऱ्यातील कोणत्याही गावात जाण्यास मनाई करण्यात आली आहे. रोहतंग टनेलच्या पलिकडील गावांना आता कन्टेन्टमेंट झोनचं रुप प्राप्त झालं आहे.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, थोरांग गावात फक्त ४२ गावकरी आहेत. यातील जवळपास सर्वच जण हिवाळ्याच्या पार्श्वभूमीवर कुलू येथे स्थलांतरीत झाले होते. त्यानंतर गावकऱ्यांनी आपली कोविड चाचणी करुन घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यात ४२ पैकी एकूण ४१ जणांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला आहे.
गावातील सर्व गावकरी काही दिवसांपूर्वी एका धार्मिक कार्यक्रमासाठी एकत्र जमले होते. या कार्यक्रमामुळेच कोरोचा फैलाव झाल्याचं सांगण्यात येत आहे. थोरांगा गावाच्या आसपासच्या परिसरातील आणखी काही जणांचे अहवालही पॉझिटीव्ह आल्याची माहिती समोर आली आहे.
लाहौलमध्ये सर्व नागरिकांना स्वत:हून पुढाकार घेऊन कोविड चाचणी करुन घेण्यासाठीचं आवाहन आमच्या टीमकडून करण्यात आलं आहे, असं लाहौलचे मुख्य आरोग्य अधिकारी डॉ.पलझोर यांनी सांगितलं. जिल्ह्यात आतापर्यंत ८५६ जणांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला आहे, असंही ते पुढे म्हणाले.