नवरात्रोत्सवात ठिकठिकाणी गरबा आयोजित केला जातो. गरबा खेळण्यासाठी इतर धर्मातील लोक येणार नाही, यासाठी भाजपाच्या नेत्याने एक सल्ला दिला आहे. गरबा खेळण्यासाठी येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला प्रवेश देण्यापूर्वी गोमूत्र प्यायला द्यावे. जर तो हिंदू असेल, तर तो विरोध करणार नाही, असे भाजपाचे इंदोरचे जिल्हाध्यक्ष चिंटू शर्मा यांनी म्हटले आहे.
भाजपा जिल्हाध्यक्षांनी म्हटले की, आजच्या काळात आधार कार्डमध्ये बदल केले जात आहेत. त्याचबरोबर गरबा खेळण्यासाठी लोक कपाळावर टिळाही लावून येतात. त्यामुळे गोमूत्र प्यायला देऊन प्रवेश द्यायला हवा.
गरबामध्ये महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करत चिंटू शर्मांनी हे विधान केले आहे. गैरहिंदू लोकांना रोखण्यासाठी आणि त्यांना प्रवेश मिळणार नाही, यासाठी त्यांनी हा उपाय सूचवला आहे.
"गाय माता आहे, त्यामुळे..."
भाजपा जिल्हाध्यक्ष चिंटू शर्मा म्हणाले, "गरबा खेळण्यासाठी मोठ्या संख्येने लोक येतात. गरबासाठी येणाऱ्या लोकांनी टिळा लावून यायला हवे. प्रत्येक व्यक्तीला गोमूत्र द्यायला हवे. गाय आपली माता असल्याने हिंदूंना गोमूत्र पिण्यात अडचण नाही."
भाजपाचे जिल्हाध्यक्ष चिंटू शर्मा यांचे हे विधान आता चर्चेत आले आहे. सगळीकडे नवरात्री आणि गरबा आयोजनाची लगबग सुरू असतानाच त्यांनी हे विधान केले आहे.