नाशिक : कपालेश्वर मंदिरातील गाभार्यात प्रवेश करून दर्शनासाठी आंदोलन करणार्या भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांना मंदिरातील गाभार्याच्या प्रवेशद्वारापर्यंत प्रवेश देण्याचा निर्णय कपालेश्वर मंदिराचे पुजारी, गुरव मंडळी व भक्तांनी पोलीस आयुक्त एस़ जगन्नाथन यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत सर्वानुमते घेण्यात आला आहे़ यास विरोध करणार्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा पोलीस आयुक्तांनी प्रसिद्धिपत्रकान्वये दिला आहे़भूमाता ब्रिगेडच्या देसाई यांनी उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कपालेश्वर मंदिरातील गाभार्यात प्रवेश करण्याचा प्रयत्न गत आठवड्यात केला होता़ मात्र पुजारी, भक्त व गुरव यांनी विरोध केल्याने परिस्थिती तणावपूर्ण झाली होती़ तसेच पोलिसांना सौम्य लाठीमार करून देसाई यांना पोलीस बंदोबस्तात बाहेर काढण्यात आले होते़ यानंतर देसाई यांनी येत्या गुरुवारी (दि़२६) मंदिराच्या गाभार्यात जाऊन दर्शन घेणार असल्याचे जाहीर केले होते़या पार्श्वभूमीवर मंदिराचे पुजारी, विश्वस्त व भक्तांची मंगळवारी (दि़ २४) पोलीस आयुक्तालयात बैठक झाली़ यामध्ये न्यायालयाचा निकाल कपालेश्वर मंदिरास लागू होत नसल्याचे सांगत देसाई यांच्या गाभारा प्रवेशास विरोध करण्यात आला़; मात्र शेवटी देसाई यांना गाभार्याच्या प्रवेशद्वारापर्यंत प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे़ (प्रतिनिधी)
तृप्ती देसाईंना गाभार्यापर्यंतच प्रवेश
By admin | Published: May 25, 2016 10:59 PM